संगमनेर विधानसभा मतदारसंघ 

महायुतीचा उमेदवार म्हणजे लादलेला उमेदवार !

भाजप निष्ठावंत नाराज, मित्र पक्षांची गोची !

सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया 

प्रतिनिधी —

संगमनेर विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मिळालेले महायुतीचे उमेदवार हे कधीच प्रामाणिक विरोधक नव्हते. तर सोयीप्रमाणे राजकारण करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने आणि स्थानिक निष्ठावंत भाजप सह मित्र पक्षांना विश्वासात न घेतल्याने ही उमेदवारी लादलेली असल्याच्या प्रतिक्रिया नाराज पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळतात.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नगर जिल्ह्यातील भाजपाचे नेते आजी-माजी आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये धूस फुस चालू असल्याचे नेहमीच समोर आले आहे. त्यातून मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवार यांनी विखेंच्या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या, याच्या सुद्धा बातम्या वृत्तपत्रातून झळकल्या होत्या आणि त्यावेळी तशी चर्चा देखील होती. आता सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने अहिल्यानगर जिल्ह्यात जे निर्णय घेण्यात आले आहेत त्याबद्दल देखील निष्ठावान भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असून मिळालेले उमेदवार हे कधीच भाजप एकनिष्ठ आणि येथील सत्ताधाऱ्यांचे विरोधक नव्हते त्यामुळे त्यांचा प्रचार करायचा की नाही अशी गोची या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांची आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची झाली असल्याची चर्चा असून नाव प्रसिद्ध न करण्याच्या बोलीवर अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी नैराश्यातून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची लढत आता ही भाजप महायुती विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडी राहिलेले नसून महसूल मंत्री विखेंचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातली झाली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे निवडणुकीतील विविध सहकारी पक्षांचा इंटरेस्ट कमी झाला असल्याचे बोलले जात असले तरी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी विखे पाटील परिवार खंबीरपणे उभा राहिल्याने नेमकी लढाई राजकीय पक्षांची एकमेकांच्या विरोधात आहे की व्यक्तिगत पातळीवर आहे याबाबत उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. त्यातच निवडणूक निरीक्षकांनी प्रचाराची पातळी सांभाळावी अशा सूचना राजकीय पक्षांना केल्याने अशा पातळीहीन प्रचार याबाबत शिक्कामोर्तब झाले आहेत.

सलग आठ वेळा निवडून आलेले आमदार बाळासाहेब थोरात यांची ही नववी निवडणूक चालू असून संपूर्ण तालुक्यातून त्यांची प्रचार यंत्रणा कार्यरत झालेली दिसते. दुसरीकडे महा युतीचे उमेदवार यांच्या प्रचाराची धुरा राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या टीमने घेतलेली असून विखे पाटील ठरवतील त्याप्रमाणे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे. फक्त आरोपांनी सुरू झालेली ही प्रचार यंत्रणा आता कोणत्या पातळीवर जाऊन थांबेल आणि मतदानानंतर कोणता निकाल लागेल हे काही दिवसात समोर येणारच आहे. मात्र संगमनेर तालुक्यात एकदम खालच्या पातळीवर आरोप आणि प्रत्यारोप झाल्याने आणि महिलांविषयी व्यक्तिगत टीका टिप्पण्या झाल्याने शहराची शांतता, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती. हे घडविणारे कोण होते ? त्याला खतपाणी घालणारे कोण होते ? हे सर्वश्रुत आहे. मतदार आणि जनता देखील हे जाणून आहे. त्यामुळे सुज्ञ मतदारांना मतदानाच्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा आणि मतदान कसे करायचे हे सांगण्याची गरज नाही. मात्र या सर्व गडबडीत पारंपारिक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांची मात्र गोची झाली आहे.

भाजप निष्ठावंतांमध्ये नाराजी तर शिंदे शिवसेनाही शांत शांत…

‘लादलेला उमेदवार’ महायुतीत अशी चर्चा असली तरी धनुष्यबाणावर निवडणूक लढवीत असलेल्या अमोल खताळ यांच्या प्रचाराबाबत शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहाने सहभागी झाले नसल्याचे दिसून येतात. अनेक महत्त्वाचे पदाधिकारी गैरहजर दिसत आहेत. संगमनेर तालुक्यात जी काही शिंदे शिवसेना आहे त्यातील महत्त्वाचे पदाधिकारी निवडणूक सुरू झाल्यापासून शांत शांत दिसत आहेत. तर भाजपच्या निष्ठावंतांमध्ये अंतर्गत धुसफूस आणि नाराजी पसरली आहे.

संगमनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कधीच पातळी सोडून राजकारण केलेले नाही. अनेक वेळा येथील सत्ताधाऱ्यांविरुद्ध त्यांनी उग्र आंदोलने केली. विविध प्रकरणे चव्हाट्यावर आणली. मात्र हे करत असताना व्यक्तिगत निंदा नालस्ती करण्यात आली नाही. तसेच महिलांबाबत तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी वक्तव्य करताना नेहमीच सावधानता बाळगली आहे आणि राजकारणाचे पथ्य पाळले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील ओरिजनल भाजपची प्रतिमा स्वच्छ असल्याने त्यांच्याविषयी सर्वसामान्य जनतेत कुठलीही नाराजीच भूमिका नाही. मात्र नव्याने आलेली मंडळी भाजपाला हानी पोहोचवत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात. भाजपाची प्रतिमा मलिन करण्यात नव्या मंडळीने मोठा वाटा उचलला असल्याचा थेट आरोप भाजपचेच कार्यकर्ते करतात. त्यामुळे निष्ठा, पक्षाची शिस्त याला प्राधान्य देणाऱ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची या निवडणुकीत मात्र मोठी गोची झालेली दिसून येते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!