‘त्या’ नगरसेवकांनी काँग्रेस पक्ष का सोडला याचा शोध सत्यजित तांबे यांनी घ्यावा — पवार

प्रतिनिधि —
त्या नगरसेवकांना काँग्रेस पक्षामध्ये का थांबायचे नव्हते ? त्यांनी पक्ष का सोडला याचा शोध सत्यजित तांबे यांनी घेणे गरजेचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नावे ठेवून स्वतःच्या पक्षाची पडझड थांबवता येईल असा भ्रम बाळगण्याचे कारण नाही. खरे तर प्रत्येकाला आपला पक्ष, पक्षाचे संघटन वाढवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे सर्वच पक्ष काम करत असतात. त्यामुळे आपल्या पक्षाचे लोक आपल्याला का सोडून जातात हेच प्रथम शोधणे महत्त्वाचे आहे. असा टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नगर जिल्हा अध्यक्ष कपिल पवार यांनी लगावला आहे.

मालेगाव नगरपालिके मधील नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये चांगलाच खळबळ उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर संगमनेर येथील कार्यक्रमात सत्यजित तांबे यांनी देखील प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस जरी आमचा मित्र पक्ष असला तरी त्यांचे वागणे पाहता ते मित्र आहेत की नाही याबाबत शंका निर्माण होते. त्यांचा आमच्याशी प्रॉब्लेम का हे समजत नाही. त्यामुळे आमचा नेमका मित्र कोण हे कळत नाही. असे म्हटले होते.
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

खरे तर त्या नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतरही पक्ष होते. इतरही पक्षात ते जाऊ शकले असते. परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले.
त्यामुळे पहिल्यांदा आपले नगरसेवक आपला पक्ष का सोडून गेले याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामागचे कारण शोधण्याचा गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर संशय व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसला नावे ठेवून आणि जाहीरपणे तसे वक्तव्य करून काहीही साध्य होणार नाही.
अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.
