माकपचे अकोले तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न.

कॉम्रेड एकनाथ मेंगाळ नवे तालुका सचिव

प्रतिनिधी —

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका अधिवेशन अकोले येथील पक्ष कार्यालयात उत्साहात संपन्न झाले. अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे काम मजबुतीने उभे करण्यासाठी तालुक्यातील १२ पंचायत समिती गणानुसार पक्षाचे विभाग संघटित करण्यात आले आहेत.

तालुका अधिवेशनापूर्वी सलग २ महिने सर्व पंचायत समिती गणांमध्ये १२ विभागीय अधिवेशने घेण्यात आली. विभागीय अधिवेशनांमध्ये विभागीय कमिट्या व विभागीय सचिव यांची निवड करण्यात आली. विभागीय अधिवेशनांचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आल्यानंतर आज दिनांक ३० जानेवारी २०२२ रोजी पक्षाचे तालुका अधिवेशन घेण्यात आले.

पक्षाचे केंद्रीय नेते डॉ. अशोक ढवळे यांनी अधिवेशनास ऑनलाइन पद्धतीने संबोधित केले. देशासमोर आज धर्मांध व भांडवलदार धार्जिण्या भाजप, आर.एस. एस. चे सरकार असून हे सरकार सातत्याने जनता विरोधी धोरणे राबवित आहे. आपली सत्तेची पोळी भाजण्यासाठी भाजप व आर. एस. एस. जनतेत धर्मांधतेचे व जतीयतेचे विष पेरत आहेत. माकप देशभर या जनता विरोधी व देश विरोधी भाजप सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करत आहे. माकप करत असलेला हा संघर्ष येत्या काळात निर्णयक विजयाच्या दिशेने जाईल व भाजपला जनता सत्तेतून खाली खेचले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाचे सचिव ज्ञानेश्वर काकड यांनी मागील ४ वर्षाचा अहवाल अधिवेशनात मांडला. चर्चे अंती अहवाल स्वीकारला गेला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष २०२२ पासून तालुक्यातील विविध जनसमुदायांच्या प्रश्नांवर निर्णायक लढे उभे करीत आला आहे. किसान सभा, सिटू कामगार संघटना, जनवादी महिला संघटना, डी. वाय. एफ. आय. युवक संघटना व एस. एफ. आय. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आरपारची लढाई उभी करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे. शेतकरी व श्रमिकांच्या लढ्याचे केंद्र म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुक्यातील राजकारणात मध्यवर्ती भूमिका पार पाडत आला आहे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तालुक्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे

जनतेने २०१९ च्या निवडणुकीमध्ये घडवून आणलेल्या परिवर्तनाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम झाले का यांची समीक्षा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गांभीर्याने करत असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल याबाबत गंभीरपणे पावले उचलत आहे पक्षाच्या तालुका अधिवेशनामध्ये याबाबत गंभीर चर्चा झाली असून लवकरच याबाबत सुस्पष्ट भूमिका घेऊन पक्ष जनतेमध्ये जाईल व तालुक्यात सध्या सुरू असलेल्या विस्कळीत संधिसाधू व स्वार्थी राजकारणाच्या विरोधात ठाम भूमिका घेईल व तालुक्याला एक तत्वनिष्ठ, विश्वासार्ह व जनताभिमुख राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पक्ष काम करेल.

आदिवासी श्रमिकांचे प्रश्न प्राधान्याने चळवळीसाठी घेत असतानाच बिगर आदिवासी शेतकऱ्यांचे दूध, सिंचन, वीज, शेतीमालाचे भाव हे प्रश्न सुद्धा पक्ष नेटाने केंद्रस्थाने आणील व तालुक्यात एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून राजकारणात हस्तक्षेप करेल असा विश्‍वास यावेळी नवनिर्वाचित तालुका सचिव कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी व्यक्त केला.

कॉम्रेड एकनाथ मेंगाळ गेल्या १७ वर्षापासून चळवळीत कार्यरत आहेत. डी. वाय. एफ. आय. या युवक संघटनेचे ते गेली सहा वर्ष जिल्हा अध्यक्ष आहेत. तालुक्यात एम.आय.डी.सी. झाली पाहिजे, तरुणांच्या हातांना काम मिळाले पाहिजे, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कसत असणाऱ्या जमिनी आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे झाल्या पाहिजेत, श्रमिकांना रेशन व निराधारांना पेन्शन मिळाले पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी झालेल्या लढ्याचे नेतृत्व कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी आजवर समर्थपणे केले आहे. कॉम्रेड एकनाथ मेंगाळ आदिवासी समुदायातून आलेले असले तरी आदिवासी समुदाया बरोबरच बिगर आदिवासी समुदायांमध्ये सुद्धा ते लोकप्रिय आहेत.

कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुक्यात मध्यवर्ती राजकारणामध्ये निर्णायक हस्तक्षेप करेल असा विश्वास यावेळी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ज्ञानेश्वर काकड व नंदू गवांदे यांनी व्यक्त केला.

तालुका अधिवेशनामध्ये ३१ कार्यकर्त्यांचा समावेश असलेली तालुका कमिटी निवडण्यात आली. तालुक्यातील १२ विभाग सचिव व जनतेच्या प्रश्नांसाठी आजवर चिकाटीने संघर्ष करत असलेले कार्यकर्ते व नेते यांचा समावेश तालुका कार्यकारणीमध्ये करण्यात आला आहे.

एकनाथ मेंगाळ, प्रकाश साबळे, शिवराम लहामटे, राजाराम गंभीरे, मंगेश गिर्हे या पाच जणांचे सचिव मंडळ यावेळी निवडण्यात आले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!