कनोली – मनोली – कनकापूर हे सध्याच्या महसूल मंत्र्यांचे कार्यक्षेत्र !

माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची महसूल मंत्री विखे पाटील यांच्यावर घणाघाती टीका

प्रतिनिधी —

सत्ता आणि पैशाच्या जीवावर राजकारण करणारी मंडळी सध्या फिरत आहे. मंत्रीपदाचा एक मान असतो. आपण महसूल मंत्री म्हणून सहा वर्ष काम केले कधीही कुणाची अडवणूक केली नाही. याउलट सध्याचे महसूल मंत्री सत्तेचा वापर करून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात मोठ्या अडचणी निर्माण करत आहेत. महसूल मंत्री मुरूमाचा ट्रॅक्टर पकडण्यासाठी कोतवालाला फोन करतो इतकी वाईट अवस्था आहे. राज्यभर फिरायचे सोडून ते फक्त कनोली मनोली कनकापूर इतकेच मर्यादित राहिले आहे.

संगमनेर तालुक्यातील जनतेच्या प्रेमामुळे सातत्याने काम करून तालुक्यातील व राज्यातील गोरगरीब जनतेच्या जीवनात आनंद निर्माण केला. सत्ताही सामान्य जनतेच्या विकासासाठी असते मात्र सध्याचे सत्ताधारी दहशतवादी निर्माण करीत आहे अशा वाईट प्रवृत्तींना तालुक्यात येऊ देऊ नका असे सांगताना विद्यमान महसूल मंत्री हे फक्त कनोली मनोली कनकापूर पुरतेच मर्यादित असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

निमोण येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन सुधाकर जोशी हे होते तर व्यासपीठावर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, साहेबराव दादा मंडलिक, बी आर चकोर, ॲड. ज्ञानेश्वर सांगळे, ॲड. नानासाहेब शिंदे, गणपतराव सांगळे, बबनराव सांगळे, चंद्रकांत घुगे, अनिल घुगे, संतोष हासे, विष्णुपंत रहाटळ, सुभाष सांगळे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, साहेबराव गडाख, रोहिदास सानप, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, सर्व क्षेत्रांमध्ये विकासातून अग्रेसर असलेला संगमनेर तालुका हा राज्यात वरच्या क्रमांकाचा ओळखला जातो. येथील शिक्षण, शांतता, बंधुभाव, अर्थव्यवस्था अत्यंत चांगली आहे. आपला सहकार, शिक्षण संस्था, दूध संघ चांगला असल्याने आर्थिक समृद्धी आली आहे. सहकारी दूध संघांमुळे खाजगी दुध संघांना येथे जास्त भाव द्यावा लागत आहे. हे चांगले वातावरण टिकवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहायचे आहे. चांगल्या वातावरणात खोडा निर्माण करण्यासाठी काही वाईट प्रवृत्ती इकडे येऊ पाहत आहे त्यांना वेळीच रोखा.

संगमनेर तालुक्यातील विकास कामांना घातलेला खोडा जनता विसरणार नाही गोरगरिबांच्या अन्नात माती माती कालवणाऱ्या प्रवृत्तींना सर्वांनी एकजुटीने रोखू या. निवडणुकीमध्ये बाहेरील राज्यातील पदाधिकारी संगमनेर तालुक्यामध्ये येऊन ढाबा संस्कृती वाढू पाहत आहेत तरुण पिढी बिघडवण्याचे काम ही मंडळी करत असून त्यांच्याबरोबर खाबऱ्यांचाही वेळीच बंदोबस्त करा असे आवाहन त्यांनी केले.

तर डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा आर्थिक समृद्ध आहे. येथे आनंद आणि शांततेचे वातावरण आहे. मागील 40 वर्षातील कामातून हा तालुका उभा राहिला आहे. निवडणूक आली म्हणून विरोधक येत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. म्हणून खोटे बोलत आहेत. दडपशाहीचे राजकारण करण्यासाठी काही मंडळी इकडे येत आहे. संगमनेर तालुका दादागिरी करत नाही आणि दादागिरी सहन करणार नाही असे सांगताना सर्वांनी एकत्र येऊन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी भक्कम उभे रहा असे आवाहन केले.

यावेळी बी. आर. चकोर, चंद्रकांत घुगे, ॲड. ज्ञानेश्वर सांगळे यांचीही भाषणे झाली. संचालक कचरू फड, भाऊसाहेब गीते, शिवाजी जगताप, किसनराव वाळके, बापूसाहेब गिरी, अण्णासाहेब शिंदे, बाबुराव गुंजाळ, राजू गुंजाळ, ललिता दिघे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन ॲड .नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले. यावेळी निमोण परिसरातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!