श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनी समुपदेशन कार्यक्रम
प्रतिनिधी —
मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण योग्य पद्धतीने केला पाहिजे.निसर्गाने आपल्याला ज्या पद्धतीने घडवले आहे तसेच स्वतःला स्वीकारा.त्यातूनच तुम्हाला खऱ्या यशाचा मार्ग सापडेल. असे प्रतिपादन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोदिनी सानप यांनी केले.श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनी समुपदेशन व महिला तक्रार निवारण विभागांतर्गत त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजेंद्र ढमक, प्रा.विमल निर्मळ, प्रा.रंजना सानप, प्रा.वृषाली खांडगे आदी उपस्थित होते.
डॉ.सानप पुढे म्हणाल्या, आपण आपल्या शरीराकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले पाहिजे. वाढत्या स्पर्धेमुळे ताण-तणावांमध्ये वाढ झाली असून आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर शारीरिक व्यायामही आपण करायला हवा. समाज माध्यमांमध्ये येणाऱ्या चुकीच्या गोष्टीकडे आकर्षित होऊ नये.मोबाईलचा वापर कमी करावा. त्यामध्ये आपली बरीच ऊर्जा वाया जाते.

मोबाईल मधील रील्स मुळे ज्ञानात भर पडत नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा न घेता चांगला विचार करून निर्णय घ्या. असे सांगून आपल्या वागण्या बोलण्यामध्ये स्वतःच्या चांगल्या भविष्याबद्दलच विचार असायला हवा. समाजामध्ये वावरत असताना चांगले वाईट ओळखणे शिका असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विमल निर्मळ, सूत्रसंचालन प्रा.रसिका दीक्षित, आभार प्रा.चारुशीला गुजर यांनी मानले.
