जगण्यात नैतिकता असेल तर यश हमखास मिळते — प्रा. सुशांत सातपुते
प्रतिनिधी —
ज्या समाजात आपण काम करतो तो समाज आपल्याला समजून घेता आला पाहिजे. समाजसेवेच्या माध्यमातूनच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करता येतो.जगण्यात नैतिकता असेल तर यश हमखास मिळते. असे प्रतिपादन प्रा.सुशांत सातपुते यांनी केले.श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा.आप्पासाहेब गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.नितेश सातपुते, प्रा.सचिन कानवडे आदी उपस्थित होते.

प्रा.सातपुते पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे समजून घेऊन ती आपल्यात रुजवता आली पाहिजेत. समाज समजून घेण्यासाठी स्वतःला पात्र बनवण्याबरोबरच समाजामध्ये आत्मविश्वासाने मिसळण्यासाठी ज्या गुणांची गरज असते त्या गुणांचा विकास आपल्यामध्ये निर्माण करता आला पाहिजे.

असे सांगून राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांची राष्ट्र घडणीसाठी महत्त्वाची भूमिका असते.त्यांनी साक्षर व निरक्षर यांच्यातील दरी कमी करून राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व विकास करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी ह्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधवाक्य प्रमाणे आपला थोडा वेळ मानव कल्याणासाठी द्यावा.असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.किरण देशमुख, सूत्रसंचालन प्रा.स्नेहल गायकवाड व प्रा.नवनाथ घुगे, आभार प्रा.सुरेखा घुगे यांनी मानले.

