राजुर ग्रामपंचायतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला हरताळ फासला !
आदेश असूनही 13 आणि 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकवला नाही…
कायदेशीर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक यांची मागणी
प्रतिनिधी —

‘हर घर तिरंगा’ केंद्र सरकारच्या आणि शासनाच्या या उपक्रमाला राजुर ग्रामपंचायतीने ‘हरताळ फासला’ असून जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला ‘तिलांजली’ देण्यात आली आहे. दिनांक 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामपंचायती समोरील ध्वजारोहण स्तंभावर राष्ट्रध्वज फडकावला नसल्याचे उघड झाले असून हा शासनाचा आदेशाचा, राष्ट्रध्वजाचा, स्वातंत्र्याचा अपमान आहे असा आरोप करीत संबंधित ग्रामसेवकासह पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्याचे आदेश दिले होते. अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यासंदर्भा सूचना वजा आदेश दिले होते. त्यामध्ये दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये गावातील सर्व घरांवर, शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर तसेच खाजगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकवण्यात यावा. तसेच तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून उस्फूर्तसहभाग नोंदविण्यात यावा असे सुचवण्यात आले होते. सदरील उपक्रमाचे सेल्फी व फोटो शासनाच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी अपलोड करण्यात यावेत, असेही बजावण्यात आले होते.
असे असताना राजुर ग्रामपंचायतीने दिनांक 13 आणि 14 ऑगस्ट 2024 रोजी तिरंगा फडकविला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जबाबदारी असणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक व भारतीय मीडिया फाउंडेशन यांनी केली आहे यांनी केली आहे .

अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चौरे यांच्याशी भ्रमणध्वरीवरून या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही. राजुर पोलिसांसह, राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी आणि प्रशासनातील सर्व मुख्य कार्यालयांना या तक्रारीच्या प्रति पाठविण्यात आलेल्या आहेत. भारतीय मीडिया फाउंडेशन च्या निवेदनावर रोहिदास लहामगे, राजेंद्र वाघ, राहुल मुर्तडक, गोरख हेकरे, सचिन मुर्तडक, अपेक्षित पवार, संतोष मुर्तडक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
