उपआयुक्त धर्मदाय अहमदनगर यांच्या कारभाराची चौकशी करा…
अपंग प्रमाणपत्राचीही चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावातील देवस्थान ट्रस्टचा वाद अहमदनगर येथील धर्मदाय उपआयुक्त यांच्या न्यायालयात सुरु होता. याबाबत विकास साहेबराव गायकवाड यांनी हरकत नोंदवली होती. परंतु अचानकपणे नियमबाह्य पद्धतीने हरकत अर्ज नामंजूर करण्यात आल्याचा आरोप करुन धर्मदाय उपायुक्त अहमदनगर यांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी धर्मदाय आयुक्त पुणे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबत चौकशीची मागणी गायकवाड यांनी केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात गायकवाड यांनी म्हटले आहे की, आश्वी खुर्द गावचे देवस्थान नोंदणी क्रमांक – ९९० चा वाद धर्मदाय उपअयुक्तां समोर सुरू आहे. याबाबत गायकवाड यांनी हरकत घेतली असून सर्व पुरावे सादर केले आहेत. तरी सुद्धा नियमबाह्य पद्धतीने त्यांचा हरकत अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. धर्मदाय उपआयुक्त यांनी अर्थिक तडजोड करुन माझा अर्ज नामंजूर केल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी करत उपआयुक्त यांचे अपंगत्व प्रमाणपत्र देखील खोटे व बनावट असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान आश्वी खुर्द देवस्थानचा खटला दुसऱ्या न्यायालयात चालवला जावा. तसेच धर्मदाय उपआयुक्त यांच्या अपंग प्रमाणपत्राची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी विकास गायकवाड यांनी केली. यावर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा विकास गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर सतिष निवृत्ती गायकवाड यांची देखील सही आहे.
