संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांची संख्या वाढणार ही बातमी चुकीची ; तहसीलदार अमोल निकम
सोशल मीडिया वरून प्रस्तावाची बनावट कॉपी व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करणार
प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांमध्ये फेरबदल करून जिल्हा परिषदेचा एक गट वाढणार असून काही गण देखील वाढणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रकाशित झाल्या आहेत.
या बातम्यांमुळे संगमनेर महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी स्पष्टपणे या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले असून असा कुठलाही प्रस्ताव महसूल विभागाकडून तयार केला जात नसल्याचे सांगितले.
संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यासंदर्भात विविध माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.

त्या अनुषंगाने संगमनेर तालुक्यात असे फेरबदल चालू असल्याचे बातम्यांमधून म्हटले आहे. त्या बातम्या अत्यंत सविस्तर स्वरूपात असून त्यामध्ये संगमनेर तालुक्यात पूर्वी असलेले ९ जिल्हा परिषद गट आणि आता एक नवीन गट वाढणार असून एकूण १० जिल्हा परिषदेचे गट होणार आहेत.
पूर्वीचे ९ गट आणि दहाव्या गटाचे नाव जाहीर करून या सर्व गटांमध्ये कोणकोणती गावे आहेत याची माहिती देखील या बातम्यांमधून प्रसिद्ध झालेली आहे.
एवढी सर्व माहिती बाहेर कशी आली किंवा ती माध्यमांना कोणी पुरवली याची चर्चा तालुक्यात सुरू होती. याबाबत संपूर्ण तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच महसूल विभागाकडे संशयाने पाहिले जाऊ लागले आहे.

राज्याचे महसूल मंत्री हे संगमनेर तालुक्याचे आमदार असल्याने हा संशय अधिकच बळावला होता. असा काहीतरी प्रस्ताव सुरू आहे अशी कुजबूज तालुक्यात सुरू झाली होती.
मात्र संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी सोशल मीडियातून एक पोस्ट करत या प्रस्तावाबाबत स्पष्ट पणे सांगितले आहे की हा प्रस्ताव कुठल्याही प्रकारे महसूल विभागाकडून करण्यात येत नाही.
तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले आहे की,
गेल्या दोन तीन दिवसांपासून समाज माध्यमांवर संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गट गण रचना प्रस्ताव circulate होत आहे. त्यावरून अनेक वृत्तपत्रांनी कार्यालयाकडे कोणतीही खात्री न करता त्याची बातमी प्रसिद्ध केल्याचे निदर्शनास आले आहे.

या कार्यालयाकडून अद्याप कोणताही असा प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. सद्य स्थितीत आयोगाकडून देखील अद्याप असे प्रस्ताव सादर करण्याबाबत अथवा गट संख्या कमी जास्त होण्यासंदर्भात पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे आपल्या पर्यंत आलेली माहिती चुकीची असून जिल्हा परिषद पंचायत समिती गट गण रचना अजूनही मागील वेळी होती तशीच आहे.
कारवाईची शक्यता
संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांच्या संदर्भात पुनर्रचनेचा प्रस्ताव संपूर्ण सोशल मीडियातून फिरत आहे. या प्रस्तावावर संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम आणि प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची नावे आणि पदे देखील छापलेली आहेत. तसेच सर्व प्रस्ताव शासकीय पद्धतीने टाइप केलेला असून या प्रस्तावात सर्व प्रकारची इत्यंभूत माहिती आहे. तरीही हा प्रस्ताव महसूल विभागाचा नाही असे तहसीलदारांचे म्हणणे आहे. असा प्रस्ताव सोशल मीडियातून कोण कोण प्रसारित करीत आहेत त्याबाबत शोध घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल असे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.
