सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचा शून्य सर्पदंश उपक्रम !
प्रतिनिधी —
सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने शून्य सर्पदंश हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. उपक्रमाअंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना सापांविषयी वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊन संगमनेर तालुका सर्पदंश शून्य करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलेलं आहे.

थोरात महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांनी शुकलेश्वर विद्यालय, सुकेवाडी येथे जाऊन ४५० मुलांसमोर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात साप किती महत्वाचे आहेत, सापांबद्दल आपल्या मनात कोणते गैरसमज आहेत, विषारी व बिनविषारी साप कसा ओळखायचा, सर्पदंश झाल्यानंतर काय करायचे याबाबत प्राध्यापिका प्रतिभा कुरकुटे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. साधारणतः १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शंका विचारल्या या शंकांच समाधान प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. लक्ष्मण घायवट, प्राध्यापिका मनिषा बलसाने व प्राध्यापिका प्रतिभा कुरकुटे यांनी केले. या कार्यक्रमात त्या शाळेतील शिक्षकांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. साधारणतः १.३० तासाच्या कालावधीमधे विद्यार्थ्यांच्या शंकांच समाधान झाल्याने हा कार्यक्रम सर्पदंश होऊ नये म्हणून व साप जतन केले जातील यासाठी नक्कीच फलदायी ठरेल. पुढेही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण घायवट यांनी व्यक्त केला.

