घुलेवाडी येथील संविधान परिषदेत बाल हक्कांचा जागर !
प्रतिनिधी —
संविधानांने बालकांच्या विकासासाठी त्यांना बाल हक्क दिले आहेत. मात्र त्या हक्कांकडे दुर्लक्ष होणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य व फ्लोरा फाऊंडेशनचे अध्यक्ष सिताराम राऊत यांनी केले आहे.

फ्लोरा फाऊंडेशन व अच्छी आदत उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने साथी दुर्वे नाना पतसंस्था सभागृह घुलेवाडी येथे संविधान परिषद-२०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आण्णाभाऊ साठे संविधान गट गांधीनगर, शिरीषकुमार संविधान गट वेल्हाळे, साऊ-ज्योती संविधान गट भांडमळा व नोबेल गुरुकुल स्कुल घुलेवाडी यांनी आयोजनात सहभाग घेतला.

संविधानाची प्रास्ताविका वाचून कार्यक्रमाची सुरुवात केली. अण्णाभाऊ संविधान गटाने व शिरीषकुमार संविधान गटाने समतेची गाणी सादर केली. नंतर दोन्ही गटातील बालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व संविधान गटात ते का येतात याबद्दल सर्वांना माहिती दिली. यानंतर कार्यक्रमातील बालकांचा आवडीचा भाग म्हणजे ‘राजा नागड धुय्या’ हे नाटक राम सईदपुरे यांनी सादर केले. बालकांनी देखील या नाटकाचा मनमुराद आनंद लुटला व नाटकात सहभागी झाले. नाटकाच्या शेवटी रामने बालकांसोबत संवाद साधला.

अण्णाभाऊ साठे गटाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्ताने बाल-प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. त्याचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. परिषदेच्या परिसरात संविधानिक पोस्टर प्रदर्शन लावले होते. ते सर्व उपस्थित बालकांनी वाचले व समजून घेतले.

शेवटी संविधान गटांनी ठराव वाचन केले.
१) संविधानिक मूल्ये समजून घेऊन ते कुटुंबात, शाळेत आणि समाजात पोहचवण्याचा ठराव करत आहे. २) आमच्या कुटुंबात, गावात व तालुक्यात बालविवाह होऊ देणार नाही. ३) शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करण्याचा ठराव करत आहोत. ४) दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करणार आहोत असा ठराव करत आहोत. ५) लोकसभा निवडणुकीदरम्यान बनवलेल्या बालकांच्या हक्कांच्या जाहीरनाम्याचा पाठपुरावा करण्याचा ठराव करत आहे.

कार्यक्रमाचे आभार बापूसाहेब खेमनर यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल घोडे व अभिजित खाडे यांनी केले. संविधान परिषदेत महात्मा फुले विद्यालय, विद्याभवन विद्यालय व आनंदवन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. कार्यक्रम संपल्यावर संविधान गटातील बालके व शशिकांत विधाते यांनी बालकांसोबत समतेची गाणी व गप्पा केल्या. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ओंकार बिडवे, बजरंग जेडगुले व स्वप्निल मानव यांनी या बालकांना मदत केली.
