घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या बदली संदर्भाचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार ;       
पोलीस उपअधीक्षक मदने
सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांच्या उपोषणाची घेतली दखल 
प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील पठार भागात घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या मटका, जुगार, वाळू तस्करी व इतर अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच घरफोड्या व चोरी या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन गस्त वाढवावी. पोलीस कारवाई करावी असे आदेश आज संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी घारगाव पोलीस स्टेशनला दिले आहेत.

घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पठार भागात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावेत. तसेच घरफोड्या आणि चोरट्यांना आळा बसवावा. यासाठी आज प्रजासत्ताक दिनी साकुर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी संगमनेर पोलिस उपअधीक्षक यांच्या उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी त्याची दखल घेत वरील आदेश देऊन लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे इघे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
पठार भागात गेल्या काही दिवसांपासून वाढले अवैध धंदे तसेच चोऱ्या, घरफोड्या यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे चोरी, घरफोडी, वाळूतस्करी, मोटरसायकल चोरी, विद्युत पंप चोरी, केबल चोरी, विविध व्यावसायिक दुकाने फोडणे या मुळे गुन्ह्यांचा आलेख वाढत असून गुन्हेगारीत वाढ होत आहे.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या कारकिर्दीत गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारीचा आलेख वाढता असून पोलीस स्टेशनला वारंवार लेखी तक्रारी अर्ज करून, समक्ष भेटून, चर्चेने माहिती देऊनही कुठलीही कारवाई केली जात नाही. दखल घेतली जात नाही.
या गुन्हेगारीला आळा बसणे आवश्यक आहे. गरजेचे आहे. यासाठी घारगाव पोलीस स्टेशनला सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे. तरी कर्तव्यदक्ष अधिकारी नेमून लवकरात लवकर गुन्हेगारांचा छडा लावावा.
या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी प्रजासत्ताक दिनी पोलिस उपअधीक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
त्याची दखल घेत पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी संबंधित पोलिस स्टेशनला कारवाईचे आदेश दिले असून ही कारवाई तात्काळ करावी व सर्व सामान्यांच्या मनात पोलिसांविषयी आदर निर्माण करावा असे आदेश बजावले आहेत.
त्यामुळे इघे यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेतले आहे. तसेच पठार भागात अर्जदारांना धमकावणे खोटे गुन्हे दाखल करणे अशी तक्रार देखील इघे यांनी केली होती. सदर बाबत योग्य ती चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षकांनी पत्रात नमूद केले आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस निरीक्षकांचे बदलीचे अधिकार पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना असून सदर कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठांना सादर करीत असल्याचे मदने यांनी पत्रात म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!