दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी आश्वी पोलिसांनी पकडली
घाटात लूटमार करण्याचा होता इरादा
प्रतिनिधी —
संगमनेर घरफोडी, बस स्थानक वरील दागिने चोरांनी पोलीस यंत्रणेला भंडावून सोडले असतानाच ११२ क्रमांकावर आलेल्या फोनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीत असलेली गुन्हेगारांची टोळी पोलिसांच्या हाती लागले. टोळीतील तिघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले असले तरी सहा जण मात्र पळून गेले आहे. संगमनेरच्या आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानोडी ते वरवंडी दरम्यान असलेल्या घाटात एम.एच. १७ सी.व्ही. १०८४ या क्रमांकाचा मालवाहू टेम्पो आणि त्यात असलेल्या नऊ लोकांकडे लोखंडी कटावणी, कटर, कुऱ्हाड, लाकडी दांडे, दोरी, मिरची पावडर असे साहित्य असून संबंधित व्यक्ती चोर असल्याचा संशय व्यक्त करणारा फोन पोलिसांच्या ११२ क्रमांकावर आला होता.

त्यामुळे पोलीस पथकाने तातडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री केली असता पोलिसांना घाटामध्ये संशयास्पदरित्या दबा धरून बसलेली टोळी आढळून आली. पोलिसांना बघतात त्यातील काहीजण पळून गेले तर तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्यांच्याकडून मालवाहू टेम्पोसह दरोड्यासाठी आवश्यक असणारे साहित्य ताब्यात घेतले. नऊ आरोपींची नावे पोलिसांनी निष्पन्न केली असून यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी पकडलेले आरोपी घाटात वाहनावर दरोडा टाकून लूटमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते.

या संदर्भात आश्वी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार बाबासाहेब पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका अल्पवयीन मुलासह आकाश सुनील पाळंदे, रोहित भिरू मुळेकर (रा. दाढ बुद्रुक, ता. राहता) यांना ताब्यात घेतले असून या तिघांसह सिद्धू मकवाने (रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता), कादिर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व शरद उर्फ गोटया हरिभाऊ पर्बत (रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) यांच्यासह अन्य तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
