संगमनेरच्या दोन वकिलांविरुद्ध महिलेची पोलीस उपअधीक्षकांकडे तक्रार 

सीडब्ल्यूसी च्या ताब्यात असणाऱ्या सात महिन्याच्या बाळाला मिळवून देतो म्हणून केली फसवणूक

तर एका वकिलानेच वकिलांना अडकवण्यासाठी डाव केला असल्याची चर्चा 

प्रतिनिधी —

अहमदनगर चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या अखत्यारीत असलेल्या आपल्या लहान बाळाला मिळवून देण्याचे आमिष दाखवत दहा हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार एका महिलेने संगमनेरच्या दोन वकिलांविरुद्ध पोलीस उपअधीक्षकांकडे केल्याने वकिलीक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणाला वेगवेगळी वळणे असल्याने नेमके खरे कोणाचे आणि खोटे कोणाचे यावर उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्या दोन वकिलांना अडचणीत आणण्यासाठी त्यांचा हितशत्रू असणाऱ्या एका वकिलाने हा डाव केला असल्याचे बोलले जात आहे.

संगमनेर तालुक्यातील एका महिलेने आपल्या लहान मुलीला त्या महिलेचा पती आणि जाऊबाईने परस्पर चाइल्ड वेल्फेअर कमिटी अहमदनगर यांच्याकडे जमा केले असल्याची तक्रार केली होती. त्याबाबत सदर महिलेने न्यायालयात धाव घेऊन आपली मुलगी परत मिळावी असा अर्ज केला होता.

या प्रकरणी सदर महिलेला संगमनेरातील दोन वकील मदत करीत असल्याचे त्या महिलेने तक्रार अर्जात म्हटले आहे. मात्र या वकिलांनी तिला मदत न करता तिचा गैरफायदा घेत तिच्याकडून दहा हजार रुपये वसूल करूनही सदर बाळ तिला मिळाले नसल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. शिवाय यामध्ये नगर येथील सीडब्ल्यूसी ऑफिस मधील एका महिलेचा सहभाग आहे. तक्रारीतल्या दोन्ही वकिलांचे त्या महिलेशी चांगले संबंध असल्याचे सदर महिलेचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे आपले बाळ आपल्याला पुन्हा मिळावे यासाठी केलेला तक्रार अर्ज सदर महिलेने त्याच वकिलांच्या सांगण्यावरून कोर्टातून काढून घेतला असल्याचेही त्या तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यामुळे नेमकी फसवणूक कशी झाली याबाबत शंका कुशंका व्यक्त होत असून पुन्हा त्या दोन वकीला विरुद्ध संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांकडे सदर महिलेने तक्रार केली आहे. तसेच बाळाच्या बॉडी बाबत उल्लेख करून सदर बाळ हयात आहे की नाही याबाबत संशयास्पद वातावरण निर्मिती केली असल्याची माहिती मिळाली आहे.

वकिलानेच केला वकिलांवर डाव ! 

तक्रार करण्यात आलेल्या ‘त्या’ दोन वकिलांवर त्यांचाच समव्यवसायिक असणाऱ्या एका वादग्रस्त वकिलाने डाव केला असून त्या दोघांना अडचणीत आणण्यासाठी सदर महिलेचा वापर केला असल्याची चर्चा वकिलांमध्ये सुरू आहे. त्या वादग्रस्त वकीलाने यापूर्वी काही कागदपत्रे देखील चोरली असल्याची माहिती वकिलांकडून समजली आहे. त्यामुळे त्या दोन वकिलांना अडचणीत आणण्यासाठी वकिलाचाच डाव असल्याची चर्चा मात्र वकिलांमध्ये रंगली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!