समाजवादी कार्यकर्त्यांचे महाविकास (इंडिया) आघाडीला मतदान करण्याचे आवाहन
प्रतिनिधी —
संगमनेर शहर आणि तालुक्यातील समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीत महाविकास (इंडिया) आघाडीला च्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही समाजवादी विचाराचे कार्यकर्ते आहोत. आमची धर्मनिरपेक्षता ,समाजवाद, विज्ञाननिष्ठा, लोकशाही व विश्वबंधुत्व या तत्त्वांसाठी लढाई आहे. सन 2024 ची निवडणूक ही संविधान, लोकशाही व धर्मनिरपेक्षता वाचवण्याची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित युतीला विरोध करून काँग्रेस प्रणित INDIA आघाडीला मदत करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही, अशी आमची समाजवादी विचाराच्या कार्यकर्त्यांची धारणा आहे. भारतीय जनता पक्षाला पोषक व्हावे म्हणून तिरंगी लढती करण्यासाठी काही शक्तींनी भाजप विरोधी मतांचे विभाजन करण्याचा ठेका उचललेला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. असे उमेदवार भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठीच हेतू पुरस्करपणे उभे केलेले आहेत अशी आमची खात्री आहे.
त्यामुळे आम्ही शिर्डी लोकसभा मतदार संघातील मतदारांना आवाहन करतो की, आपण सर्वांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने उभे केलेल्या उमेदवाराच्या मागे उभे राहावे आणि मशाल या चिन्हांला मतदान करावे. शिर्डी मतदार संघाबाहेर ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत त्यांना मतदारांनी मतदान करावे असे आवाहन आम्ही करत आहोत.
निवेदनावर सीताराम राऊत, हिरालाल पगडाल, ॲड. समीर लामखडे, राजाभाऊ अवसक, ॲड.नईम इनामदार, ॲड. गोपीनाथ घुले, ॲड.रंजना पगार, डॉ.सुनीता राऊत, जुबेर इनामदार, अर्जुन वाळके, प्रशांत पानसरे, विठ्ठल शेवाळे, राम चन्ना, चंद्रकांत एनगंदूल आदींची नावे आहेत.

