देशातील महागाई व बेरोजगारीला भाजप जबाबदार – डॉ. जयश्री थोरात
महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ विविध गावात बैठकांना प्रतिसाद
प्रतिनिधी —
प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या ही खोटी आश्वासने भाजप सरकारने दिली. उलट अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. महागाई भरमसाठ वाढली, महिला असुरक्षित झाल्या. या सर्वांना भाजप सरकार जबाबदार असून इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास गरीब कुटुंबातील महिलांना एक लाख रुपये वार्षिक मिळणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ निमज, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर, खांडगाव, रायते या विविध गावांमधून त्यांनी घोंगडी बैठकांमधून मतदारांना आवाहन केले.
डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, सध्या महागाई भरमसाठ वाढली आहे. डिझेल पेट्रोल 100 रुपयाच्या पुढे गेले आहे. तर गॅस हजार रुपयांच्या पुढे आहे. भाजप सरकारने नोकऱ्या निर्माण केल्या नाही. फक्त तरुणांना दीड जीबी डाटा विकत दिला. आणि त्यामध्ये अडकवून ठेवले त्यामुळे अनेकांना आपली बेरोजगारी कळत नाही.

मोबाईल मध्ये अडकलेल्या युवक जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याला बेरोजगारी कळाली असून त्यामुळे देशांमध्ये या सरकार विरोधात मोठी लाट निर्माण झाली आहे. धर्माचे मुद्दे पुढे करून तरुणांची डोकी भडकवली जात आहे. परंतु देर आहे दुरुस्त आहे सर्व तरुणाई आता भाजपाच्या विरोधी झाली असून आगामी काळात इंडियाचे सरकार सत्तेवर येणार आहे.
काँग्रेसने कायम सर्व समावेशक राजकारण केले सर्व जाती धर्मांना न्याय दिला. काँग्रेसच्या न्याय या जाहीरनामातून गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षाला एक लाख रुपये मिळणार आहे. याचबरोबर सर्वांचे हक्क आबाधित राहणार असून आपली लोकशाहीअधिक बळकट होणार आहे. तेव्हा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता तरुण नागरिक व महिलांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

