पंतप्रधान आणि महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात समाज माध्यमामध्ये आक्षेपार्ह मजकूर आणि पोस्ट टाकणाऱ्या विरोधात कारवाईची महायुतीची मागणी
प्रतिनिधी —
महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच यापुर्वी अनेकदा समाज माध्यमांमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जाणीवपुर्वक बदनामीकारक मजकूर आणि पोस्ट टाकल्या जात आहेत.

या पोस्टमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीकडून केले जात आहे. या आक्षेपार्ह पोस्टमुळे महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाकडून दंगल घडविण्याचा करण्यात आलेला आरोपही खूप गंभीर आणि पक्षाची बदनामी करणारा आहे.

महायुतीच्या नेत्यांच्या विरोधातील पोस्ट आणि मजकूरांमुळे भावना दुखावल्या जात असून याला वेळीच पायबंद घातला न गेल्यास महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानाही आंदोलनात्मक भूमिका घेवून या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.

आमच्या भावनांचा विचार करून आशा वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या विरोधात आपण कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा यापुढे होणाऱ्या आंदोलनाची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही निवेदनात दिला आहे यावेळी महायुतीचे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
