कार मधून आलेल्या टोळीचा शेळ्या चोरण्याचा प्रयत्न फसला !
लोकांनी पकडून बेदम मारले आणि पोलीस ठाण्यात दिले
तिघांना अटक ; एक जण पसार
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावच्या शिवारात एका डोंगराच्या पायथ्याजवळ शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या वयस्कर व्यक्तीचे हातपाय आणि तोंड बांधून व त्यांना झाडाला बांधून त्यांच्या २१ गावरान शेळ्या आणि बोकड चोरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका टोळीचा प्रयत्न फसला आहे.

गावातील डोंगराकडे आलेल्या काही व्यक्तींनी शेळ्या चोरताना पाहिल्याने ही टोळी शेळ्या तेथेच सोडून सोबत आणलेल्या गाडीसह पळून गेली. सायखिंडी फाट्या जवळ काही लोकांनी त्यांची गाडी अडवून या चोरट्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या गोंधळाचा फायदा घेत यातील एक चोरटा गाडीसह पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावच्या शिवारात पुष्कराज कंपनीच्या पाठीमागे एका डोंगराच्या पायथ्याजवळ आणि परिसरात सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वामन देवजी दुधवडे (वय ६५, हल्ली राहणार वेल्हाळे, मूळ राहणार शेंडेवाडी, तालुका संगमनेर) हे आपल्या ताब्यातील शेळ्या आणि बोकड चरायला घेऊन गेले होते. त्यामध्ये अकरा गावठी मोठ्या शेळ्या, पाच गावठी बोकड आणि पाच गावठी लहान शेळ्या असा एकूण ८५ हजार रुपयांच्या किमतीचा एकूण मुद्देमाल त्यांच्याजवळ होता.

त्याचवेळी त्या ठिकाणी एका इको कारमधून चार व्यक्ती आल्या. दुधवडे हे एका झाडाखाली दुपारचे जेवण करत बसले होते. हिंदी भाषेत बोलणारे डोंगरावर जाण्यासाठी कुठून मार्ग आहे वगैरे चौकशी करत होते. टोळीतील चौघेजण त्यांच्या आजूबाजूला दोन तीन चकरा मारून गेले. त्यानंतर त्यांनी अचानक पाठीमागून येऊन दुधवडे यांना पकडून त्यांचे हातपाय बांधले आणि आरडा ओरडा करू नये म्हणून त्यांचे तोंड देखील बांधले व त्यांना झाडाला बांधून ठेवले.

त्यानंतर त्या शेळ्या हकण्यास सुरुवात करून ते काही अंतर गेले असता त्या परिसरात आलेल्या काही लोकांनी हे लोक या शेळ्या घेऊन कुठे चालले आहेत याची चौकशी करू लागताच ही टोळी शेळ्या तिथेच सोडून गाडी घेऊन पळून गेली. मात्र ही खबर सगळीकडे पसरतात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि सायखिंडी फाट्याजवळ या चौघांना गाडीसह पकडण्यात आले. टोळीतील एक जण गाडी घेऊन पसार झाला. तिघांना संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत. एराफ आलम अन्सारी ( वय१९, राहणार शांतीनगर तालाब, भिवंडी बायपास, भिवंडी, जिल्हा ठाणे) अन्सारी सानिफ मुक्तार (वय २२, कसाई वाडा, भिवंडी) मोहम्मद माजीद मोहम्मद अस्लम अन्सारी (वय १८, राहणार शांतीनगर, भिवंडी) यांना अटक करण्यात आली आहे तर इको गाडी क्रमांक एम एच 04 एलबी 0742 वरील चालक जिशान (संपूर्ण नाव माहित नाही) हा प्रसार झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहेत.
