संगमनेरात कत्तलखान्यावर पुन्हा छापा !

दोघांना अटक ; एक पसार, चार दिवसांची पोलीस कोठडी

२५०० किलो गोवंश मांसासह ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांमधून होणारी गोवंश हत्या कितीही छापे मारले तरी बंद होण्याचे नाव घेत नसून सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने शहरातील या अवैध कत्तलखान्यात पुन्हा छापा मारला असून या छाप्यात २ हजार ५०० किलो गोवंश मांसासह ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चारच दिवसात छापा टाकण्याची ही दुसरी घटना असून या कारवाईत सुद्धा हजारो किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे.

या छाप्यामध्ये दोन जणांना पकडून त्यांना अटक करण्यात आली असून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. सलीम जानमोहम्मद कुरेशी आणि कैश अशपाक कुरेशी या दोघांना अटक करण्यात आले असून काशिफ असद कुरेशी हा आरोपी पसार झाला आहे. या दोन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शहरातील मदिना नगर भागात गल्ली क्रमांक दोन येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत आहे. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे तसेच राहुल डोके यांच्यासह पथकाने मदिना नगर गल्ली क्रमांक दोन मध्ये जाऊन एका पत्र्यच्या शेडमध्ये पाहिले असता त्या ठिकाणी गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याचे दिसून आले.

यावेळी त्या ठिकाणी छापा टाकला असता सलीम जानमोहम्मद कुरेशी (वय १९, राहणार सुभाष नगर, कोपरगाव, हल्ली रा. मदिना नगर, संगमनेर) कैश अशपाक कुरेशी (वय २२, राहणार मदिना नगर, संगमनेर) या दोघांना पकडण्यात आले. तर काशीफ असद कुरेशी (राहणार मदिना नगर) हा अंधराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

घटनेच्या ठिकाणी पोलिसांना जनावरांचे कत्तल केलेले अडीच हजार किलो वजनाचे मांसाचे तुकडे मिळून आले. त्याची बाजारभावाने किंमत पाच लाख रुपये असून त्या ठिकाणी कुऱ्हाडी, चाकू, टोच्या व इतर हत्यारे आढळून आली त्यांची किंमत एक हजार रुपये आहे. असा एकूण ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेऊन जप्त मुद्देमालातील गोमांस सॅम्पल केमिकल तपासणी कामासाठी राखून ठेवण्यात आले असून इतर गोमांस जागीच नाश करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

RRAJA VARAT

One thought on “संगमनेरात कत्तलखान्यावर पुन्हा छापा !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!