साकुर येथे मारुती कार मध्ये आढळलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गुढ अद्यापही कायम

अपघात की घातपात ? संशय वाढला….   

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या साकुर गावच्या शिवारात मंगळवारी ( दिनांक 16 एप्रिल) रात्री एका मारुती वॅगनॉर कार मध्ये पारनेर तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा अपघात आहे की घातपात ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या प्रकरणातील पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अद्याप मिळालेला नसल्याने व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेरा राखून ठेवल्याने तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजले नसल्याने मृत्यूचे गुढ अधिकच वाढले आहे.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकस्मात होणारे मृत्यू तसेच बेवारस आढळून येणाऱ्या मयत व्यक्तींच्या तपासा विषयी आणि पोलिसांच्या भूमिकेविषयी नागरिकांमधून नेहमी संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूच्या बाबत देखील पोलिसांच्या तपासाबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

मनोज गोविंद वाळुंज (वय 32 वर्षे, रा. पळशी, ता. पारनेर) असे मयत झालेल्या या तरुणाचे नाव आहे.

मंगळवारी रात्री मारुती वॅगनॉर कार क्रमांक एम एच 15 बी एक्स 3479 ही कार साकुर गावच्या शिवारात मांडवे कडून साकुर चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पेंडभाजे वस्तीच्या जवळ रस्त्याच्या कडेला रात्री ११ वाजता बेवारस आढळून आली. यामध्ये निपचित पडलेला हा तरुण आढळून आला होता. सदर तरुणाला उपचारासाठी संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच तो मयत झाल्या असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

घारगाव पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टेम  साठी प्रवरानगर येथील रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाचा अहवाल आला नसल्याने नेमका मृत्यू कशाने झाला आहे हे अद्याप समजलेले नाही. तसेच या गाडीचा अपघात झाला होता की आणखी काही संशयास्पद बाबी आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सदर मयत तरुण हा गाडीमध्ये चालकाच्या सीटवरुन डाव्या बाजूला पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या तोंडातून रक्त येत होते. छातीवर, अंगावर आणि गाडीतही रक्त सांडलेले होते. शिवाय त्याने मद्य प्राशन केले असावे असा अंदाज असून गाडीमध्ये मद्याची  बाटली देखील सापडली असल्याची माहिती समजली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आर. व्ही. भुतांबरे हे करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!