संगमनेरात सोनसाखळी चोरांची मज्जा !
भर दिवसा महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण पळविले
प्रतिनिधी —
सर्व प्रकारच्या अवैध धंद्यात आघाडीवर असणाऱ्या संगमनेर तालुक्यात चोऱ्या देखील आघाडीवर आहेत. संगमनेर शहरात भर दिवसा एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले आहे. गेल्या महिन्याभरातील ही साधारण सातवी ते आठवी घटना आहे. अद्याप पर्यंत एकही सोनसाखळी चोर पकडला गेल्या नसल्याने या चोरट्यांची मज्जा सुरू असल्याचे चित्र आहे.

शहरातील बस स्थानकावर पाकीट मारी, सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीची साखळी सुरू असतानाच आता महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरण्याचे (चेन स्नॅचिंग) प्रमाण देखील वाढले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर ते लोणी रस्त्यावर पंचायत समिती कार्यालयासमोर मोटार सायकल वरून पतीसोबत पाठीमागे बसून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मोटार सायकल वरून आलेल्या दोन अज्ञात इसमां पैकी पाठीमागे बसलेल्या एकाने गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून पळवून नेल्याची घटना घडली आहे.

विजया प्रकाश गवांदे (राहणार पोखरी हवेली, तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ या पुढील तपास करत आहेत.
