मंदिर परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास दहा वर्ष सक्तमजुरी
प्रतिनिधी —
एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे असे सांगून अल्पवयीन मुलीला दुचाकीवर जुन्नर तालुक्यात असलेल्या खंडोबा मंदिर परिसरात नेत तेथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमास संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध कलमांतर्गत दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

पांडुरंग यशवंत शेंगाळ, (रा. शेंगाळवाडी, हिवरगाव पठार ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी घटनेच्या दिवसापासून तब्बल सात वर्ष फरार होता. कोरोना महामारीच्या काळात तो आपल्या घरी आला होता. नेमकं याच दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. न्यायालयाने काढलेल्या वॉरंटमुळे फरार असलेला आरोपीला पोलिसांना पकडता आले. त्यानंतर आरोपी तुरुंगात होता.

१९ जुलै २०१३ रोजी आषाढी एकादशीनिमित्त शाळेला सुट्टी होती. मात्र सुट्टीच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दहावीत शिकणारी पंधरा वर्षे पीडित मुलगी शाळेमध्ये जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे देण्यासाठी गेली होती. शाळेतील शिक्षकांकडे कागदपत्रे देऊन ती घरी परतत असताना पांडुरंग यशवंत शेंगाळ हा आपल्या दुचाकीवरून येत रस्त्यात तिला भेटला.

पळशी (ता. पारनेर) येथे पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊन लगेच येऊ, असे म्हणत त्याने पीडित मुलीला फसवून आपल्या दुचाकीवर बसवत घारगाव-बोटा -केळेवाडी- कातरवेढा या रस्त्याने जुन्नर तालुक्यातील नळावणे या गावाच्या जवळ माळावर असलेल्या खंडोबा मंदिरात नेले. मंदिरात देवदर्शन घेतल्यानंतर साडेअकरा बारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने मंदिराच्या गेटमध्ये पीडित मुलीला जवळ घेऊन आवळत माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू फार आवडतेस म्हणून मी तुला फसवून येथे निवांत ठिकाणी घेऊन आलो असल्याचे सांगितले. पीडित मुलीने त्याच्या प्रेमाबद्दल नकार दिल्यानंतर त्याने तिला खाली पाडून तिच्यावर बलात्कार केला.

पिडीतेने यावेळी आरडाओरडा केला मात्र जवळ कोणी नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही. नंतर आरोपीने याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला महागात पडेल, व मी तुझा कायमचा काटा काढील असा दम दिला. तो पीडित मुलीला तेथेच सोडून जाईल या भीतीने तिने कोणाला काही सांगणार नाही असे सांगून त्याच्या गाडीवर बसून शेंडेवाडी येथे नातेवाईकाकडे जात तेथे मुक्कामी थांबले. तेथून दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला शाळेत आणून सोडले व तो निघून गेला. यावेळी पीडित मुलीचे आई-वडील तिला शोधण्यासाठी शाळेत आले असता तिने झालेल्या प्रकार आई-वडिलांना व शाळेतील शिक्षकांना सांगितला. त्यानंतर आई वडिलांच्या मदतीने पीडित मुलीने घारगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पांडुरंग यशवंत शेंगाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याची सुनावणी न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांच्यासमोर सुरू होती. सहायक सरकारी अभियोक्ता संजय वाकचौरे यांनी सरकार पक्षाच्यावतीने काम पाहताना या खटल्यात पीडित मुलीसह, पीडितेचे वडील, पंच, वर्गशिक्षक, शाळेचे हेडमास्तर, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी या सात जणांच्या महत्त्वपूर्ण साक्षी न्यायालयासमोर आणल्या. दोन्ही पक्षाकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांनी आरोपी पांडुरंग यशवंत शेगाळ याला दोषी ठरवत भादवी ३६३ नुसार सात वर्ष सक्तमजुरी, ३७६ नुसार दहा वर्षे सक्तमजुरी, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) चार अंतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील पंचवीस हजार रुपये पीडित मुलीला देण्याच्या आदेश न्यायालयाने दिले.
