अमली पदार्थ, अवैध धंद्यात मुद्देमाल मिळतो मात्र आरोपी पळून जातात….
संगमनेर शहर पोलिसांची ‘अजब गजब’ छापेमारी…
प्रतिनिधी —
संगमनेर शहरांनी पोलिसांनी केलेल्या बऱ्याच कारवायांमध्ये आरोपी पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. छापेमारीच्या वेळी आरोपीच्या ताब्यातील मुद्देमाल पोलिसांना मिळतो, मात्र आरोपी कसे पळून जातात असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांच्या या छापेमारीच्या ‘अजब गजब कहानी’ची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

विशेष म्हणजे अमली पदार्थ गांजा विक्री करणारा आरोपी तसेच दिवसाढव्या ढवळ्या उघड्यावर गावठी दारू बनवणारे आरोपी आणि सातत्याने गोवंश हत्या करणारे कत्तलखान्यातील आरोपी पळून जाण्याचे प्रकार समोर आले आहेत. छापा टाकल्यानंतर हे आरोपी पळून जातातच कसे असा सवाल नागरिक उपस्थित करतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी संगमनेर शहर पोलिसांनी संजय गांधी नगर मध्ये छापा टाकून एका आरोपीच्या ताब्यातील अर्धा किलो पेक्षा जास्त गांजा हस्तगत केला. मात्र आरोपी पळून गेला. या आधी सुद्धा कत्तलखान्यात छापे मारल्यानंतर शेकडो किलो गोवंश मास, वाहतूक करणारी वाहने, कसायांची शस्त्रे पोलिसांना मिळतात. मात्र गाय आणि गोवंश कापता कापता आरोपी कसे पळून जातात ? हा एक संशोधनाचा विषय आहे. असे आरोपी पळून गेल्याच्या नोंदी आहेत.

त्याचप्रमाणे दोनच दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलिसांनी दिवसाढवळ्या गावठी दारू गाळप अड्डा सुरू असलेल्या ठिकाणी छापा मारला या ठिकाणी देखील आरोपी पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे छापे मारल्यानंतर पोलिसांना मुद्देमाल मिळतो मात्र आरोपी पळून जातात ही एक ‘अजब गजब कहानी’ म्हणावी लागेल.
