दूधगंगा पतसंस्था अपहर प्रकरण
संभाजीनगर उच्च न्यायालयाने शकुंतला कुटेंसह परिवाराचा जामीन फेटाळला
प्रतिनिधी —
दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या पत्नी मुले आणि सुनांचा जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने देखील नाकारला आहे. त्यामुळे शकुंतला कुटेसह अन्य आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

संगमनेरच्या प्रतिष्ठित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमन भाऊसाहेब कुटेसह सतरा आरोपींचा ८१ कोटी रुपयांचा अपहार समोर आला आहे. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेने आपल्या घरातील कुटुंबीयांचा नातेवाईकांच्या मदतीने हा आर्थिक घोटाळा केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. मुख्य आरोपी असलेला कुटे आपल्या कुटुंबीयांसह गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून त्याच्यासह कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेचा अपवाद वगळता कुटुंबातील अन्य सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती. यात कुटे याची पत्नी शकुंतला व विमल भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे व सोनाली दादासाहेब कुटे यांचा समावेश होता. गेल्या काही महिन्यांपासून या जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित होता. कुटे कुटुंबीयांच्या जामीन अर्जावरील निर्णयाकडे ठेवीदार, सभासद, सहकारातील जाणकार आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेचे लक्ष लागले होते.

संभाजीनगर खंडपीठाचा निर्णय आल्याने आता आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांना अटक करून ठेवीदारांना दिलासा देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा न्यायालयासह आता खंडपीठानेही जामीन नाकारल्याने कुटे कुटुंबीयांना जेलवारी निश्चित झाली आहे. मात्र यासाठी आर्थिक गुन्हे शाखेला आता दडपण झुगारून काम करावे लागणार आहे.
