लाखो रुपयांच्या बनावट ताडी नंतर संगमनेरात गांजा आणि गर्द (हेरॉईन) पकडले !
सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे केंद्र संगमनेर…
प्रतिनिधी —
संगमनेर शहराच्या मध्य वस्तीत असणाऱ्या शिवाजीनगर येथे छापा टाकून अहमदनगर गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने गांजा आणि गर्द (हेरॉईन) विक्री करणाऱ्या अटक केली आहे. नुकतीच पुणे पोलिसांनी संगमनेर मध्ये येऊन मोठी कारवाई करीत लाखो रुपयांचे बनावट ताडी करण्याचे साहित्य (केमिकल) छापा टाकून पकडले होते. त्यानंतर लगेचच अमली पदार्थांची ही दुसरी कारवाई संगमनेरात झाली आहे. सातत्याने होणाऱ्या या कारवायांमुळे संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे पितळ उघडे पडले असून नगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमुख केंद्र संगमनेर झाले असल्याचे दिसून येत आहे.

अंबादास शांताराम शिंदे, (रा. जैन सर्कल, शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 5 लाख 17 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी 4 किलो 498 ग्रॅम गांजा आणि 36 ग्रॅम गर्द (हेरॉईन) जप्त केले आह.

संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत राहणाऱ्या वरील इसमांकडून अमली पदार्थ विक्री केली जात असल्याची खबर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क करून शहर आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. संशयीताच्या घराची झडती घेतली असता संशयीत बसलेल्या पलंगाच्या खाली एका गोणीत उग्र वास येत असलेला गांजा बिया, बोंडे, काड्या, पाने संलग्न असलेला पाला मिळुन आला. तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लॅस्टीक पिशवीत विटकरी रंगाची पावडर (गर्द) मिळून आली.

आरोपी शिंदे विरुध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii, 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.

सर्व अवैध धंद्यांचे केंद्र संगमनेर
संगमनेर शहर आणि तालुक्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे वारंवार उघड होत आहे. अमली पदार्थ गांजा, गर्द याचबरोबर केमिकल द्वारे बनावट ताडी बनवणे हे तर उघड झाले आहेच. परंतु शहर आणि ग्रामीण भागात वाळू तस्करी, कत्तलखाने, गोवंश हत्या, गुटखा विक्री, मटका, जुगार असे अनेक प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यात संगमनेर तालुका अवैध धंद्यांचे केंद्र बनला असल्याची चर्चा आहे.
