संगमनेर पोलीस उपविभागात 23 जणांना प्रवेश बंदी !

पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यात आणि संपूर्ण संगमनेर पोलीस उपविभागातील शांतता, कायदा सुव्यवस्था आणि निवडणुक शांततेत पार पाडावी यासाठी त्रासदायक असणाऱ्या 23 जणांना संगमनेर पोलीस उपविभागात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसे आदेश पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिले आहेत.

सद्यस्थितीत सुरू असणारी लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता व या आचारसंहितेदरम्यान येणारे विविध सण, उत्सव शांततेत पार पाडावे त्याचप्रमाणे आचारसंहिता उल्लंघना संबंधाने कोणताही गैरप्रकार होऊ नये  या दृष्टीने संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन व अकोले पोलीस स्टेशन मधून एकूण 46 व्यक्तींना संगमनेर तालुका तसेच अकोले तालुक्याच्या स्थळ सीमा हद्दी मध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते. सदरचे प्रस्ताव सीआरपीसी 144 खाली सादर करण्यात आले होते. त्यापैकी एकूण 23 व्यक्तींवर आज आज रोजी उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी  प्रवेश बंदीचे आदेश  पारित केले आहेत. आदेशांची बजावणी आज रोजी पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. उर्वरित 23 प्रस्तावांवर देखील लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

ज्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्यासंबंधाने गुन्हे ज्या व्यक्तींवर दाखल आहेत अशा व्यक्तींवर सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. सुरू असलेली निवडणूक आचारसंहिता याबरोबरच रमजान ईद, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई करण्यात आली आहे.

दि 24 /4 / 2024 पर्यंत सदर व्यक्तींना प्रवेश बंदी लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये या व्यक्ती संगमनेर तालुका किंवा अकोले तालुका हद्दी मध्ये मिळून आल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!