‘जय श्रीराम’ म्हटला नाही म्हणून मुस्लिम युवकास टोळक्याची बेदम मारहाण !
संगमनेरची शांतता धोक्यात…
प्रतिनिधी —
‘जय श्रीराम’ ची घोषणा दे असे म्हणत आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने एका मुस्लिम युवकाला संगमनेर बस स्थानकावर बेदम मारहाण केली. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे संगमनेर शहराचे वातावरण ढवळून निघाले असून शहराची शांतता धोक्यात आली आहे. शहरात तणावाचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी संगमनेर तळ ठोकून आहेत.

याबाबत हुजेब अय्याज शेख (वय 25 वर्षे राहणार मोमीनपुरा, संगमनेर) याने फिर्याद दिली असून अक्षय धुमाळ, गोल्या ठाकूर, अमोल मिश्रा यांच्यासह पाच ते सहा जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

शनिवारी सायंकाळी बसस्थानकावर ही घटना घडली आहे. शेख याने फिर्यादीत म्हटले आहे की, मी संगमनेर बसस्थानकावर एका मेडिकल स्टोअरमध्ये औषधे घेण्यासाठी आलो असता तीन-चार जणांच्या टोळक्याने माझ्याकडे रागाने पाहत पुढे जाऊन पुन्हा परत आले व आमच्याकडे रागाने का बघतो म्हणून मला दमबाजी करू लागले आणि ‘जय श्रीराम’ म्हण नाहीतर तुझ्याकडे बघावे लागेल, तुम्ही लांडे खूप माजले आहात असे म्हणत मला लाथाबुक्याने मारहाण सुरू केली.

त्याचबरोबर इतर पाच-सहा जण देखील सामील होऊन मला शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने मारहाण करू लागले. त्यांच्या तावडीतून सुटून जवळच असलेल्या एका सराफाच्या दुकाना समोरून पळत असताना माझ्या पाठीमागे कोणीतरी वीट फेकून मारली. परंतु वीट मला लागली नाही. त्यानंतर मी घुलेवाडी कडे जाणाऱ्या रिक्षा स्थानकाजवळ जाऊन थांबलो. त्यावेळी अक्षय धुमाळ, गोल्या ठाकूर, अमोल मिश्रा हे तिघे जण आणि पाच ते सहा अनोळखी लोक माझ्या जवळ येऊन मला पुन्हा लाथाबुक्याने मारहाण करू लागले. मारहाण करत असताना गोल्या ठाकूर याने हातातील काहीतरी टनक वस्तूने माझ्या डाव्या खांद्यावर जोरात मारून जखमी केले. मारहाण करत असताना व शिवीगाळ करत असताना ‘या लांड्याला मारून टाका, ‘उठाव दांडे भागाव लांडे’ अशा मोठमोठ्याने घोषणा देऊन शिवीगाळ करत मारहाण करत होते.

तेथे जमलेल्या लोकांनी मला दुसऱ्या बाजूला नेले आणि तेथील एका मोबाईल शॉपीमध्ये बसवून ठेवले. त्यानंतर पुन्हा तेथे अक्षय धुमाळ गोल्या ठाकूर व मिश्रा व इतर पाच सहा जणांनी येऊन मला शिवीगाळ करून मारहाण केली. काही वेळातच तेथे पोलीस आल्याने या मारहाण करणाऱ्या लोकांनी तिथून पळ काढला.

हुजेब शेख याने वरील स्वरूपाची फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीं विरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान घटना घडताना बस स्थानकावर मोठा जमाव जमल्याने पोलिसांची चांगली धावपळ उडाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कालूबर्मे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी फौजफाट्यासह धाव घेतली व जमावाला पांगवले. शहरात तणावाचे वातावरण असून कुठलीही घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

