पद्मश्री विखे कारखान्याने शेतातील ऊस नेला नाही म्हणून शेतकऱ्याने गट ऑफिस मध्ये स्वतःला कोंडून घेतले !
प्रतिनिधी —
उसाची लागवड करून सोळा-सतरा महिने होऊन गेले. ऊस पूर्णपणे वाढलेला असून आता नुकसान होत आहे. तरीही ऊस तोडण्यासाठी कारखान्याकडून कोणतेही पाऊले उचलली जात नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या लोणी येथील गट विकास कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले होते. या घटनेला दोन दिवस झाले असले तरी अद्यापही कारखान्याकडून कोणतीही हालचाल झाली नसल्याचे शेतकरी दीपक विखे यांनी सांगितले.

लोणी खुर्द आणि बुद्रुक परिसरातील काही शेतकऱ्यांचा ऊस पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने अद्याप तोडून नेला नसल्याने उसाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. त्यातच अनेक वेळा संपर्क करूनही ऊस नेला नाही. म्हणून लोणी येथील दीपक विखे यांनी कारखान्याचा निषेध करून दोन दिवसांपूर्वी लोणी खुर्द आणि बुद्रुक च्या गटविकास कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले होते.

त्यानंतर दोन दिवस होऊन गेले तरीही अद्याप पर्यंत उसाला तोड आलेले नाही असे विखे यांचे म्हणणे आहे. प्रवरा नदीच्या पाटाला पाणी आल्यानंतर त्या पाण्याचा झिरप वाढतो. आणि त्यामुळे शेतात चिखल निर्माण होतो. ऊस वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ऊस पूर्ण वाढ झालेली असताना व पाटाच्या पाण्याने चिखल होण्याआधीच ऊस घेऊन जावा अशी विनंती आम्ही कारखान्याला केली होती. परंतु त्यांनी उस नेला नाही म्हणून आंदोलन करावे लागले असे विखे यांनी सांगितले. आजही कारखान्याकडून आमच्या परिसरात फक्त एकच ट्रॅक्टर द्वारे ऊस वाहून नेला जात आहे. अद्यापही माझ्या ऊसाला तोड आले नाही असे विखे यांनी सांगितले.

कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध आवाज उठवण्यास कोणीही तयार नाही. शेतकरी लोक त्यांना घाबरतात. त्यामुळे कोणीही तक्रार करत नाही. मात्र मी धाडसाने हे आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना कारखान्याकडून त्रास देणे हे चुकीचे असून शेतकऱ्यांचा ऊस ताबडतोब कारखान्याने तोडून यावा अशी मागणी दीपक विखे यांनी केली आहे.

