द्वेषाचं आणि संकुचितराजकारण न करता समाजकारण वाढवावं लागेल — डॉ. जयश्री थोरात
प्रतिनिधी —
21व्या शतकातील भारताला विकासाची वाटचाल करताना मानवी मुल्यांची कास सोडून चालणार नाही. अनेक चढ-उतार सोसुनही भारतीय समाजाच्या हजारो वर्षांच्या अस्तित्वाचा पाया हा समताधिष्ठित, मुल्याधिष्ठित समाज राहिला आहे. ते टिकवायचे असेल तर द्वेषाचं संकुचितराजकारण न करता त्यात समाजकारण वाढवावं लागेल. संगमनेरची महाराष्ट्राच्या राजकारणातील ही ओळख आहे.महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत स्वच्छ आणि सुंदर खेड्यांच्या निर्मितीमध्ये सामावलेला आहे. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे योगदान महत्वाचे असल्याचे मत एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना व सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार शिबिर पोखरी हवेली ता.संगमनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुशीला आगळे, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, सरपंच सुदाम खैरे, उपसरपंच सोमनाथ थिटमे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन आगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ, डॉ.विलास कोल्हे, कार्यालय अधिक्षक गोरक्षनाथ पानसरे आदि उपस्थित होते.

डॉ. थोरात म्हणाल्या की, आजचा युवक अत्यंत बुद्धीमान आणि कुशल असून, काही तरी नवे करण्याची स्वप्न बाळगून आहे.युवा शक्तीमुळे देशाच्या विकासाला गती मिळून विकसित खेड्यांची निर्मिती होईल. देशातला प्रत्येक नागरिक स्वावलंबी व्हावा आणि त्याला प्रतिष्ठेचे जीवन जगता यावेयासाठी प्रयत्न करायला हवे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून गावामध्ये स्थानिक ग्रामस्थाच्या मदतीने विविध कामे हाती घ्यावीत त्याचा उपयोग निश्चितच राष्ट्र उभारणीसाठी होईल असे मत व्यक्त केले.यावेळी त्यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयाने शिबिरासाठी निवडलेल्या विषयांचे व कार्याचे भरभरून कौतुक करताना त्यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीतील नेतृत्व करताना राष्ट्रीय सेवेभाव जपण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सुशीला आगळे, सुदाम खैरे, सोमनाथ थिटमे, सचिन आगळे, दत्तात्रय चासकर, बाबुराव गवांदे यांनी या विशेष श्रमसंस्कारशिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य डॉ.दीनानाथ पाटील यांनी, प्रास्ताविक प्रा.नाना दिघे, तर पाहुण्यांचा परिचय प्रा.ललिता महाले, कार्यक्रमाचे आभार प्रा.संतोष सुर्वे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.स्नेहल थिटमे यांनी केले.या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, ग्रामस्थ आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

