संगमनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार !
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन
प्रतिनिधी —
भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संगमनेर येथे डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारले जाईल अशी जाहीर घोषणा केली असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

मागील महिन्यात विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा संगमनेरात उभारला जाईल अशी घोषणा केली होती. या घोषणेचे संगमनेर तालुक्यातील जनतेने स्वागत केले मात्र बहुजन पालक छत्रपती शिवरायांसोबत बहुजन उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा संगमनेरात झाला पाहिजे अशी मागणी डॉ आंबेडकर प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य प्रा. शशिकांत माघाडे, पत्रकार गौतम गायकवाड, विधिज्ञ अमित सोनवणे यांनी केली होती तसेच माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

यामुळे सर्व नागरिकांचे लक्ष पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लागले होते. संगमनेर तालुक्यात हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला होता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात संगमनेरातील पूर्णाकृती स्मारके हा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ शकतो. आज पालकमंत्री विखे यांनी संगमनेरला येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमताई माघाडे आणि गौतम गायकवाड यांनी पूर्णाकृती स्मारका संदर्भात पालकमंत्र्यांना लेखी निवेदन दिले आणि आपली भूमिका मांडली.

दोन्ही महापुरुषांच्या स्मारकांसंदर्भात आपण सकारात्मक असून संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणारे यथोचित स्मारक शासन उभारेल अशी घोषणा या वेळी विखे पाटील यांनी केली. याच वेळी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना स्मारकासाठी संगमनेरात जागा शोधण्याचे आदेश दिले. यामुळे संगमनेरातील बहुजन आणि आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून पालकमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे.

यावेळी डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव अण्णासाहेब अडांगळे, के.एस. गायकवाड, ए.पी. बनसोडे, विनय घोसाळे , कुसुमताई माघाडे, विलासराव दारोळे, ॲड. अमित सोनवणे, असिफ शेख, विनोद गायकवाड व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

