श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान गौरव दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा !

प्रतिनिधी —

श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान गौरव दिन व महात्मा फुले स्मृती दिन नुकताच एकत्रित साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा वेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक अनिल मुन्तोडे यांनी फुले यांचे जीवन कार्य उलगडून दाखवले.

बहुजन म्हणजे शूद्र-अतिशूद्र यांना प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा १ हजार ओळींचा पोवाडा लिहिला. तसेच दहा दिवसांची शिवजयंती महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये सुरुवात केली. परंतु याचे श्रेय मात्र भलतेच लोक घेतात. आरक्षणाची कल्पना महात्मा फुलेंनी मांडली. त्यांचा विचार पुढे घेऊन छत्रपती शाहूंनी कोल्हापूर संस्थानात बहुजन समाजाला सर्वात प्रथम १९०२ ला आरक्षण म्हणजेच प्रतिनिधित्व दिले. त्यावेळची ही एक निर्णायक घटना होती.

म.फुले व छत्रपती शाहूंचाच विचार पुढे घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी  संविधानात प्रतिनिधित्वाची तरतूद केली. “ज्यांची जितकी संख्या त्यांना तितका वाटा” हे तत्व संविधानात वापरण्यात आले. प्रतिनिधित्व यासाठी रिझर्वेशन शब्द वापरण्यात येतो तो चुकीचा आहे. प्रतिनिधित्व म्हणजे रिप्रेझेंटेशन व आरक्षण म्हणजे रिझर्वेशन, संविधानात ३४० कलम – मराठाकुणबी- ओबीसींसाठी,(यांची ५२टक्के लोकसंख्या पण आतापर्यंत वाटा २७ टक्केच मिळालाय.)३४१ कलम एस. टी. साठी म्हणजे अनुसूचित जातींसाठी १५ टक्के वाटा,व ३४२ कलम अनुसूचित जमातींसाठी म्हणजे ८ टक्के वाटा गरजेचा आहे हे आंबेडकरांनी पटवून दिले. शोषित वर्गातील मागास लोकांना प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. हे मुन्तोडे यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक करताना प्राचार्य श्रीकांत माघाडे  यांनी सांगितले की “जोपर्यंत जातिव्यवस्था अस्तित्वात राहील तो पर्यंत आरक्षण ठेवावे लागेल. जर जात मानणाऱ्या भारतीयांनी जातीव्यवस्था नष्ट केली तर आरक्षणही आपोआप नष्ट होईल. यासाठी सर्व जातींमध्ये रोटी बेटी व्यवहार होणे गरजेचे आहे. उच्च जातींनी जातींचा अहंकार सोडणे गरजेचे आहे व भारतीय म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे. तरच हा देश प्रगतीपथावर राहील अन्यथा हा देश रसातळाला जाईल.

विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी धर्मभेद, जातीभेद, तसेच जुन्या वाईट रूढी-परंपरा सर्वांनी सोडून दिल्या पाहिजेत. काळासोबत आपले विचार बदलले पाहिजेत. सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. संविधानाप्रमाणे जर प्रत्येक नागरिकाने आचरण केले तर हा देश नक्की जगात महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही.”

यावेळी स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन शिवाजी खुळे उपस्थित होते. थोरात एस .के यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन शिक्षकप्रतिनिधी सातपुते ए.बी.यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!