कॉ.पी.बी.कडू पाटील एक समर्पित जीवन !
राजकारणातले समर्पण, पक्षनिष्ठा आणि जीवन तत्वे यावर ठाम राहात समाजकारणा बरोबरच चळवळीच्या राजकारणातून ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असे कॉम्रेड पी.बी. कडू पाटील यांचा आज स्मृतिदिन. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी त्यांच्या लेखातून कॉम्रेड पी.बी. कडू पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.
अहमदनगर जिल्हा हा जसा विस्ताराने मोठा आहे. तसा राज्याच्या विविध क्षेत्राताच्या विकासात देखील येथील नेतृत्वाचा मोठाच वाटा राहीला आहे. सहकार चळवळ येथेच वाढली. शिक्षण, शेती, सांस्कृतिक चळवळ समृध्द झाली. यामध्ये जिल्ह्यातील जुन्या पिढीतील अनेक धुरीनांनी महत्वपुर्ण योगदान दिले. यात महत्वाच्या शिलेदारांपैकी एक असलेले आपले संपुर्ण आयुष्य समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित करणारे माजी आमदार कॉ.पी.बी.कडू पाटील हे होय.
राहुरी तालुक्यातील सात्रळ बु ! येथे शेतकरी कुटुंबात आप्पाचा जन्म झाला. बालवयातच स्वातंत्र्य प्रेमाचे बीज त्यांच्या मनात रोवले गेले. १९४२ च्या चळवळीत डॉ.अण्णासाहेब शिंदे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, धर्मा पोखरकर, पी.बी.भांगरे, कॉ.पी.बी.कडू पाटील, ॲड.रावसाहेब शिंदे ही मंडळी अग्रभागी होती. पट्टा किल्ला (आजचा विश्रामगड) या परिसरात ते बहुतांश वास्तव्य करीत. या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटीशांच्या दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या दुरध्वनीच्या तारा तोडल्या. ते अनेक दिवस भूमिगत राहिले. ब्रिटीशांविरुध्द असहकार पुकारुन तीव्र क्रांतीकारी चळवळ उभी केली.या काळात आप्पांना दिडवर्ष तुरूंगवास भोगावा लागला.

१५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या माणसांच्या विकासाठी सहकाराचा समृध्द मार्ग स्विकारला. त्यामध्ये आदर्श तत्वे रुजविली. शेतकऱ्यांना संघटीत केले आणि सहकार चळवळ वाढविली.
सर्वधर्मसमभाव व पुरोगामी विचारांचे पाईक असलेल्या आप्पांनी जनमाणसाच्या सेवेच काम सुरु केले. वकीलीच्या माध्यमातून सातत्याने अनेकांना न्याय मिळवून दिला. ते गोर -गरीबांकडून वकीलीची कोणतीही फी घेत नव्हते.मोठा जनसंपर्क असलेले आप्पा काही काळ राहुरी तालुक्याचे आमदार राहिले.या काळात अत्यंत उल्लेखनिय कार्य त्यांचे राहिले.
रोजगार हमी कायदा, राहुरी कृषी विद्यापीठाची स्थापना, मुळा डावा कालवा, वांबोरी – झरेकाठी चारी, दलीतांच्या समस्या, मुळा धरणग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न, कामगारांचे प्रश्न यासाठी अनेक चळवळी व आंदोलने त्यांनी केले. प्रवरा व राहुरी कारखान्याच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले.१९७२ च्या भयानक दुष्काळात त्यांनी पशुधन वाचविण्यासाठी गोड गवताचा शोध लावला. व याला विद्यापीठाने ही मान्यता दिली.वैयक्तीक जीवन अतिशय स्वच्छ, संस्कृत व पारदर्शी ते जगले. अंधश्रध्दावर आयुष्यभर त्यांनी टिका केली.अंधश्रध्दा निर्मुलनाच्या चळवळीत ते अग्रभागी राहिले. शनि शिंगनापुरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी सर्वप्रथम आंदोलन केले. आयुष्यभर खंडकरी शेतकऱ्यांसाठी लढा दिला. व त्यांना न्याय मिळवून दिला.
आयुष्याच्या उत्तरार्धात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचे काम सांभाळतांना रयत सेवक म्हणून शिक्षण क्षेत्रात झोकून दिले. गोरगरीबांच्या मुलांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे म्हणून ध्यास घेतला. या सर्व काळात त्यांनी आपला वाचनाचा छंद जोपासला, सातत्याने जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत राहिले.प्रचंड प्रवास, सोळा-सतरा तास काम त्यांनी केले. आजारपण अथवा थकवा त्यांनी कधीही जाणवला नाही.

माझी ज्या – ज्यावेळी त्यांच्याशी भेट झाली. त्या – त्या वेळी त्यांनी प्रचंड उत्साह मला दिला. माणसांशी कायम जवळीक ठेवा. हा प्रेमाचा संदेश दिला. माझ्या निवडणूकीच्या काळात ही कायम काय मदत करु असे नेहमी विचारायचे. मी म्हणालो आप्पा तुमचा आशिर्वाद आहेच. प्रचंड उत्साह, अफाट स्मरणशक्ती मोठा जनसंग्रह हे आप्पांचे वैशिष्टे होते.
सडपातळ शरीर, पांढरा शुभ्र पोशाख, गांधी टोपी हे त्यांचे वैशिष्ट्ये होते.आप्पा प्रत्येकाला मायेचा आधार देत.जीवनाच्या अखेरपर्यंत कम्युनिष्ठ व पुरोगामी विचार सरणी त्यांची राहीली. कुटूंबाचा हाच सेवाव्रत्ती वारसा अरुण पा.कडू यांनी पुढे जोपासला आहे.
कॉ.पी.बी.कडू पाटील (आप्पा) यांच्या जीवन कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन
आमदार डॉ. सुधीर तांबे
