महसूलमंत्री थोरात यांना सहकारमहर्षी गणपतराव साठे जीवनगौरव पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी —
काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना ‘सहकार महर्षी गणपतराव साठे जीवनगौरव’ हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्राच्या सहकार चळवळीमध्ये मोठे योगदान देणारे गणपतराव साठे हे सोलापूर जिल्हा बँकेचे चेअरमन, लोकल बोर्डाचे अध्यक्ष, माढा तालुक्यातील विविध संस्थांचे संस्थापक आणि पहिल्या विधान मंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राज्यातील विविध मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो.
या वर्षी गणपतराव साठे यांचे अमृत महोत्सवी वर्ष असून त्यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर झाला आहे.
थोरात हे १९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले असून राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, रोहयो, पाटबंधारे, खार जमीन, जलसंधारण, राजशिष्टाचार अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून अत्यंत पारदर्शी व मोठे काम राज्यभर त्यांनी केले आहे. शांत, संयमी व मनमिळाऊ स्वभाव यामुळे संपूर्ण राज्यात थोरात हे लोकप्रिय आहेत. काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळून पक्षाला मोठे यश मिळवून देत महा विकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
काँग्रेस पक्ष व पुरोगामी विचारांचे एकनिष्ठ पाईक असणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचे सहकार, शिक्षण, समाजकारण, ग्रामीण विकास ,शेती व दुग्ध व्यवसाय , पर्यावरण जलसंधारण पायाभूत विकासात मोठे काम असून हे काम राज्याला दिशादर्शक ठरले आहे.
समाजातील सर्व सामान्य माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी अविश्रांत काम करणाऱ्या नामदार थोरात हे सध्याच्या विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य असून त्यांचे विधिमंडळातील सर्व सदस्य व मार्गदर्शन घेत असतात. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे राज्यात सर्व पक्ष व सामाजिक संघटना यामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा आदर असून यशवंतरावजी चव्हाणांचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
महसूल खात्यामध्ये त्यांनी ई- पीक पाहणी हा अभिनव उपक्रम राबवला असून डिजिटल सातबारा, ऑनलाइन महसूल प्रणाली ही कामे उल्लेखनीय ठरली आहे. नुकताच राजस्थान सरकारने ई गिरदावरी नावाने ई पीक पाहणी प्रकल्प राजस्थानमध्ये सुरू केला असून महाराष्ट्राचा हा प्रकल्प संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरणारा झाला आहे.
यापूर्वीही त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सहकार महर्षी गणपतराव साठे सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमात हा पुरस्कार थोरात यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र किसान काँग्रेसचे अध्यक्ष व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संदीप साठे यांनी दिली आहे.
