भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या पायाभरणीत मौलाना आाझाद यांचे मोलाचे योगदान — आमदार बाळासाहेब थोरात
प्रतिनिधी —
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू याच्या मंत्रीमंडळात मौलाना अबुल कलाम आझाद हे शिक्षण मंत्री होते. त्यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या पायाभरणी साठी अत्यंत मोलाचे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

यशोधन कार्यालय येथे मौलाना आझाद यांच्या जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होत. जावेद शेख, नजीर सय्यद, बाबा खरात, सुरेश झावरे, श्रीराम कुऱ्हे, अनिल थोरात आदी उपस्थित होते.

आ.थोरात म्हणाले की, मौलाना आझाद हे महात्मा गांधी याच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले महत्वाचे नेते होते. ते काही काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांचा इस्लाम धर्माचा खुप अभ्यास होता. आझाद यांनी नेहमी धर्मनिरपेक्षता व राष्ट्रीय एकात्मतेला महत्व दिले. आजच्या युगात आपल्या समोर राष्ट्रीय एकसंघता व राष्ट्रीय एकात्मता ही अधिक मजबुत करण्याची गरज आहे. धर्माच्या, जातीच्या नावावर लोकामध्ये फुट पाडली जात आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत दुर्दैवी आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील या थोर महान नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच स्वप्न पाहिले. त्याला धक्का बसतोय की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे. विघातक शक्ती या समाजात तेढ निर्माण करु पाहत आहेत. अशा शक्तींना रोखण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.

