मराठा समाज आरक्षणासाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा !
प्रतिनिधी —
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. राज्याच्या वाड्या वस्त्यांवर आणि ग्रामीण भागात देखील या आंदोलनाचे लोन पोहोचले असून संतप्त मराठा समाजाच्या नागरिकांनी विविध प्रकारच्या आंदोलनाने सरकारला धारेवर धरले आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या बिरेवाडी येथे आज महाराष्ट्र सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली

मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर हे आंदोलन पेटवले असून उपोषण, आमरण उपोषण, साखळी उपोषण आणि विविध मार्गाने आरक्षण मिळावे यासाठी सर्व स्तरातून आंदोलने केली जात आहेत. राज्य सरकारसह केंद्र सरकार मराठा समाजाला नुसते झुलवत ठेवत असल्याने समाज संतप्त झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील पठारभागात सकल मराठा समाजाच्या वतीने आज रविवारी (दि. २९) रोजी राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आणि अंत्यविधी करुन राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी पठारभागातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते साकूर जवळील बिरेवाडी येथे एकत्र आले होते. त्यानंतर बिरेवाडी येथील हनुमान मंदिरापासून राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. हि अंत्ययात्रा बिरेवाडी गावातील स्मशानभूमीत नेत अंत्यविधी करण्यात आला. तसेच यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पठारभागाच्या विविध गावांमधील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.

दरम्यान संगमनेर शहर बस स्थानकावर देखील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू असून सर्व समाजातील नागरिक या ठिकाणी येऊन पाठिंबा देत आहेत. त्याचप्रमाणे राज्याच्या सर्वोच्च शिखरावर कळसुबाई गडावर एका दिव्यांग व्यक्तीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे.

जोपर्यंत मराठा आरक्षणा साठी समाजाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन वेळोवेळी करण्याचा इशाराही देण्यात आला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात नो एंट्री असणार आहे. तसेच गावातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

