मराठा समाजाच्या आरक्षणासाठी थेट महाराष्ट्राच्या सर्वोच्च कळसूबाई शिखरावर दिव्यांगाचे उपोषण !
पोलिसांची उडाली तारांबळ
प्रतिनिधी —
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ग्रामीण भागात आणि प्रत्येक तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी साखळी उपोषणे सुरू झाली आहेत. त्यातच जरांगे यांनी आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून एका दिव्यांग व्यक्तीने थेट कळसुबाईच्या शिखरावर उपोषण सुरू केल्याने पोलिसांची चांगली तारांबळ उडाली आहे. राजुर पोलीस उपोषणकर्त्याला उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखरावर मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिनांक २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत तीन दिवस उपोषण करण्याचा निर्णय एका दिव्यांग व्यक्तीने घेतला आणि कळसुबाईच्या शिखरावर थेट उपोषण सुरू केले. या संदर्भात राजूर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिसांची चांगली तारांबळ उडाली.

उपोषणकर्ते हे पैठण येथील शिवाजी गाडे नावाचे कार्यकर्ते असून त्यांनी उपोषणाची कोणतीही पूर्वकल्पना न देता उपोषण सुरू केले असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी सांगितले आहे. उपोषणकर्त्यास उपोषणापासून आणि आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू असून सदर ठिकाण हे उंचावर असल्याने वेळोवेळी मदत पोहोचवणे शक्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारा असल्याचे दातरे यांनी सांगितले आहे

संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या घटनेची संपूर्ण माहिती घेतली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

