शिक्षणाचे खासगीकरण व कंत्राटी भरती विरोधात संगमनेरात मोर्चा !
शिक्षणाची प्रयोगशाळा थांबवा…अन्यथा मुंबईत धडक मोर्चा — आमदार तांबे
प्रतिनिधी —
शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क शासन चुकीच्या धोरणातून हिरावून घेत आहे. सरकारने शिक्षणाची प्रयोगशाळा तातडीने बंद करावी अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली असून शिक्षणाचे खासगीकरण, कंत्राटी भरती, समूह शाळा या निर्णयाविरोधात संगमनेर मध्ये विविध संघटनांच्या वतीने विराट जन आक्रोश मोर्चा पार पडला.

संगमनेर तालुका समन्वय समितीच्या वतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांसह विविध संघटनांच्या वतीने यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय हा धडक मोर्चा झाला. यामध्ये विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हिरालाल पगडाल, भाऊसाहेब चासकर, छात्र भारतीचे अनिकेत घुले यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व विद्यार्थी विद्यार्थीनी, पालक व नागरिक सहभागी झाले होते.

शासकीय नोकर भरती मध्ये कंत्राटीकरण थांबवावे, राज्यातील सरकारी शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा, शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे, समूह शाळा प्रकल्पास विरोध अशा विविध मागण्यांसाठी असलेल्या या मोर्चात विद्यार्थिनी व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र शासन शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाठी अनेक चुकीचे निर्णय घेत आहे. राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. सर्वांना मोफत सक्तीचे व गुणवत्तेचे शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे.परंतू शासन खाजगी कंपन्यांना सरकारी शाळा देऊन शिक्षणाचे खासगीकरण करत आहे.

आदिवासी वाडी वस्तीवरील खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या मुलांसाठी असलेल्या शाळा बंद करून समूह शाळा करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे राज्यातील दोन लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हे निर्णय रद्द करावेत अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, यापुढील काळातही कोणत्याही विभागात सरकारने कंत्राटी भरती करू नये. कोणतीही शाळा बंद करू नये. राज्यातील खेड्यापाड्यातील लाखो मुली व गरिबांची मुले यामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची मोठी भीती आहे. सर्वच कंत्राटी पद्धतीने करायचे असेल तर शिक्षण विभागच कंत्राटी पद्धतीने करणार का असा सवाल करताना शिक्षणातील प्रयोगशाळा थांबवा अन्यथा मुंबई पर्यंत धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही आमदार सत्यजित तांबे यांनी दिला आहे.

यावेळी दुर्गाताई तांबे, भाऊसाहेब वाकचौरे, अनिकेत घुले, हिरालाल पगडाल, भाऊसाहेब चासकर, बाबा खरात, गणेश गुंजाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
