मराठा आरक्षणासाठी संगमनेरात तरुणाची आत्महत्या !
प्रतिनिधी —
राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाची धग पोहोचली आहे. आंदोलन चिघळले आहे. अशातच काही धक्कादायक घटना घडू लागल्या आहेत. एक मराठा लाख मराठा असा चिठ्ठीत उल्लेख करत संगमनेर तालुक्यातील झोळे येथे तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दि.( ३१) ऑक्टोबर रोजी पहाटे घडली आहे. सागर भाऊसाहेब वाळे (वय२५) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर वाळे हा तरूण झोळे येथे राहात असून तो संगमनेर येथे काम करत आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्व जेवण करून झोपले होते. मंगळवारी सागर हा घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन मयत झाल्याचे आढळून आले.

त्याठिकाणी एक वही सापडली असून त्यामध्ये आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. एक मराठा लाख मराठा. आपला लाडका सागर मराठा असा उल्लेख चिठ्ठीत केलेला आहे.

दरम्यान घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह खाली घेतला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

