सावकारी पाशात अडकलेल्या व्यक्तीची आत्महत्या

प्रतिनिधी —

२० हजार रुपयांच्या कर्जा पोटी तब्बल दीड लाख रुपये देऊनही आणखी पैशाची मागणी करणाऱ्या संगमनेरातील सावकाराच्या जाचास कंटाळून राजापुरमधील व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली. यासंदर्भात मृताच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकारणी संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी दोघा सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सावकारांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती मिळाली.

अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय ४३ वर्षे) रा. राजापुर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नांव असून मृत नवले यांच्या पत्नीने दिलेल्या फियार्दीवरुन संगमनेरमधील सुदाम दुधे (रा. नेहरु चौक) व बालकिसन (पुर्ण नांव माहिती नाही रा. देवाचा मळा, संगमनेर) या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या अण्णासाहेब नवले यांनी आपल्या आर्थिक अडचणी दुर करण्याकरीता दुधे व बालकिसन यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. दरवेळी या पैशाची परतफेड करत त्यांनी तब्बल दीड लाख रुपये या सावकारांना दिले.

मात्र तरीदेखील त्यांच्याकडून आणखी व्याजाची अवास्तव मागणी सुरुच होती. सावकारांच्या सातत्याने होणाऱ्या आर्थिक मागणीला कंटाळून नवले यांनी सोमवारी सकाळी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले. त्यानंतर नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात येत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

नवले यांच्या पत्नी आशा नवले यांनी दिलेल्या फियार्दीवरुन शहर पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडे सावकारकीचा परवाना आहे किंवा नाही याची माहिती समजु शकली नाही. पोलीस तपासात ही बाब पुढे येणार असुन पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख पुढील तपास करत आहे.
——–

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!