निळवंडे उच्चस्तरीय कालव्यांच्या कामाचा प्रश्न पेटला !
पालकमंत्री विखे पाटील यांना तीव्र विरोध ; पोलीस आणि आंदोलकांची झटापट
प्रतिनिधी —
निळवंडे कालव्यांचा प्रश्न पेटला असून आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शेतकऱ्यांच्या प्रखर संतापाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी मोठ-मोठे अडथळे उभे करूनही शेतकऱ्यांनी तीन ठिकाणी हे अडथळे तोडत आंदोलन केले. आणि विखे पाटलांना कालव्यांमधून पाणी सोडण्यासाठी विरोध केला. अखेर विखे पाटलांनी शेतकऱ्यांसमवेत बैठक घेत ३० ऑक्टोबर पर्यंत कालव्यांची कामे पूर्ण केल्यानंतर पाणी सोडण्यात येईल असे मान्य केले.

निळवंडे धरणातून अकोले तालुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी उच्चस्तरीय कालव्यांची कामे पूर्ण करावीत यासाठी अनेक दिवस आंदोलने सुरू आहेत. उच्चस्तरीय कालव्याचे काम अपूर्ण ठेऊन पाणी वाहून नेण्यासाठी महसूलमंत्री विखे पाटील धारणस्थळी आले असताना येथील शेतकऱ्यांनी त्यांना जोरदार विरोध केला.

मोठा पोलीस बंदोबस्त लावून शेतकऱ्यांना एक किलोमीटर दूर अडविण्यात आले होते. शेतकऱ्यांनी तीन ठिकाणचे पोलीस बॅरिकेट्स तोडत प्रतिकार केला. अखेर विखे पाटील यांना शेतकऱ्यांशी चर्चा करावी लागली. ३० ऑक्टोबर पर्यंत उच्चस्तरीय कालव्याचे काम पूर्ण करून अकोले तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्याचे मान्य करावे लागले. झालेल्या संघर्षात अनेक शेतकऱ्यांच्या बरोबरच डॉ अजित नवले जखमी झाले.

