दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण
मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे सह इतर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी जन आक्रोश आंदोलन व उपोषण सुरू
प्रतिनिधी —
दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला आहे. घोटाळेबाज भाऊसाहेब कुटे याच्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी आज शनिवारी (१४ ऑक्टोंबर) प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश व उपोषण सुरू केले आहे.

दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या तब्बल ८१ कोटी रुपयांच्या रकमेचा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या नातेवाईक आणि अन्य काहीजणांनी अपहार केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन व राजकीय प्रतिष्ठित असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी काही आरोपी अटकेत असून काही जणांना जामीन मंजूर झाला आहे. तर यातील मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.गुन्हा दाखल होऊन तब्बल दोन महिन्याचा कालावधी उलटत आला असला तरी तपास यंत्रणा या राजकीय प्रतिष्ठित आरोपींपर्यंत पोहोचू शकल्या नाही यामुळे बँकेच्या ठेवीदार सभासद संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

त्यामुळे दूधगंगा नागरी पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीने शनिवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन व उपोषण सुरू केले. या आंदोलनात जवळपास दोनशे ठेवीदार सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सुस्त झालेल्या तपास यंत्रणेवर आंदोलनाचा कितपत परिणाम होतो हे लवकरच समोर येईल.

