दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण !

खासदार सदाशिव लोखंडे यांनी उपोषणकर्त्यांची घेतली भेट

न्याय न मिळाल्यास आत्मक्लेष आंदोलन व आत्मदहनाचा इशारा !

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे व इतर आरोपींना त्वरित अटक करा या मागणीवर ठेवीदार ठाम

प्रतिनिधी–

संगमनेरसह नगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या दूधगंगा सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि इतर आरोपींना अटक करावी या प्रमुख मागणीसह ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने संगमनेरचे प्रांत अधिकारी कार्यालया समोर जन आक्रोश आंदोलन आणि उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली व  गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देऊन याप्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगितले.

दूधगंगा पतसंस्थेच्या या महाघोटाळ्यात २१ संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी फक्त सहाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील काही आरोपी जमिनीवर देखील सुटले आहेत. परंतु या घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि सूत्रधार पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे त्याचे कुटुंबीय आणि उच्चभ्रू प्रतिष्ठित आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत.

पोलिसांच्या तपासाबाबत तीव्र नाराजी

दोन महिने होत आले तरी मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत. अनेक वेळा तक्रारी व आंदोलनाचा इशारा देऊनही या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही. आर्थिक गुन्हे शाखा नगर यांच्याकडे हा तपास असून त्यांच्याकडून तपासात अद्यापर्यंत कोणतीही प्रगती झाल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे या तपासाबाबत नेहमीच साशंकता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या तपासाबाबत आणि वरिष्ठांच्या दुर्लक्षा बाबत ठेवीदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या आंदोलनाची गंभीर दखल शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी घेतली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते आंदोलन स्थळी आले व आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांचे समवेत भाजप शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले होते. छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी आंदोलकांची भेट घेऊन छावा ब्रिगेड संघटनेच्या वतीने पाठींबा जाहीर केला.  करण्याचे आश्वासन दिले.

खासदार लोखंडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी, तालुका उपनिबंधक, यांना लवकरात लवकर २१ आरोपी, कर्जदार व जामीनदार यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करून ठेवी परत करण्यासाठी विशेष प्रयत्न करा अशा सूचना दिल्या.

संघर्ष समितीने जनआक्रोशआंदोलन व उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करण्यात आली परंतु जोपर्यंत आरोपी भाऊसाहेब कुटे व त्यांचे कुटूंबीय, चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, कृष्णराव कदम व त्यांचे कुटूंबिय, संदिप दगडू जरे या व उर्वरित आरोपींना अटक होत नाही, कर्जदार व जामीनदार यांच्या मालमत्ता जप्त होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन बेमुदत चालूच राहिल. ठेवीदारांना योग्य न्याय न मिळाल्यास आत्मक्लेष आंदोलन व आत्मदहन करण्यात येईल असा इशारा दुधगंगा ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!