दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण

संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन आणि उपोषण !

मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे व इतर आरोपींना त्वरित अटक करावी 

दूधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समिती

प्रतिनिधी —

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणी गुन्हा दाखल असलेला मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि इतर आरोपींना त्वरित अटक करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी पतसंस्था ठेवीदारांच्या संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रांत अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयासमोर दिनांक १४ ऑक्टोबर रोजी ‘जनआक्रोश आंदोलन आणि उपोषण’ करण्यात येणार आहे.

संगमनेरच्या सहकार क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या दूधगंगा पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय आणि इतर २१ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्यापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी कुटे  याच्यासह त्याचे कुटुंबीय व इतर आरोपी गेल्या एक ते दीड महिन्यापासून पसार आहेत. कुटे व त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तर इतर आरोपींवरही पोलिसांनी अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिके बाबत संशय निर्माण झाला असून संतप्त ठेवेदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या  आहेत –

१) चेअरमन भाऊसाहेब दामोधर कुटे व कुटुंबियांचा जामीन फेटाळल्यामुळे त्यांना २४ तासात अटक करा. तसेच उर्वरीत आरोपींना त्वरीत अटक करा.

२) २१ आरोपी, सर्व कर्जदार, सर्व जामीनदार यांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करा. व आमच्या ठेवी व्याजासह परत करा.

३) एमपीआयडी कायद्यातील तरतूदीनुसार कर्जदार व जामीनदार यांच्या प्रॉपर्टी लिलावासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा.

४) बोगस कर्जवाटपाची चौकशी झाली पाहिजे. (उदाहरणार्थ – २ लाख रु. किंमत असलेल्या प्रॉपर्टीवर प्रमाणापेक्षा जास्त

कर्ज दिले कसे ?) त्यामधील गैरव्यहवार व सेटलमेंटची चौकशी झाली पाहिजे.

५) २०१६ पूर्वीचे व २०२१ नंतरचे सरकारी ऑडिट झाले पाहिजे.

६) गैरव्यवहार व अपहार ८१ कोटींचा असल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास व्हावा.

७) सहकार खाते, महसूल खाते, पोलीस खाते, सरकारी वकील व न्यायव्यवस्था यांचा योग्य ताळमेळ व समन्वय ठेवावा.

८) प्रत्येक ठेवीदाराची FIR दाखल करून घ्या. ९) ठेवीदार व खातेदार यांना योग्य त्या न्यायाचे आदेश व्हावेत.

या निवेदनावर मोहन लांडगे, प्रभाकर राहाणे, कैलास देशमुख, लहानबाई आगलावे यांच्या सह्या आहेत.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री, पालकमंत्री तथा महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी, अहमदनगर, पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, तालुका उपनिबंधक यांना देण्यात आल्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!