सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करा
महाराष्ट्र टीडीएफ ची मागणी
प्रतिनिधी —
अहमदनगर येथील सीताराम सारडा हायस्कूलचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही गुंडांनी प्राणघातक हल्ला केला, त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचा महाराष्ट्र टीडीएफ तीव्र निषेध करत असून हल्ला करणाऱ्या गुंडांना त्वरित अटक् केली पाहिजे अशी मागणी टीडीएफने केली आहे.

टीडीएफचे राज्य महासचिव हिरालाल पगडाल यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना प्रत्यक्ष भेटून या प्रकरणात पोलीस तपासात जी ढिलाई दिसून आली त्याबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली आहे.

कोणत्याही शाळेपासून शंभर मीटरचा परिसर तंबाखू मुक्त असावा असा शासन निर्णय आहे.शालेय विद्यार्थी हा देशाचे भावी भवितव्य असतो, तो व्यसनमुक्त रहावा यासाठी तंबाखू, गुटखा, विडी,सिगारेट मुक्त शाळा परिसर या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने व पोलिसांनी केली पाहिजे असाही आग्रह पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्याकडे श्री.पगडाल यांनी धरला आहे.

आपल्या शाळेचा परिसर तंबाखू मुक्त असावा यासाठी हेरंब कुलकर्णी यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे शाळेला खेटून असलेल्या गुटखा विडी सिगारेट विकणाऱ्या टपऱ्या हटवणे महानगरपालिकेला भाग पडले. कदाचित यातून दुखावल्या गेलेल्या शक्तींनी कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लावून गुन्हेगार शोधून काढावेत अशी टीडीएफची मागणी टीडीएफने केली आहे.

