स्थानिक इतिहास लेखनातून संगमनेरचा इतिहास समृद्ध होईल – डॉ. नवनाथ वाव्हळ

थोरात महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाची स्थापना

प्रतिनिधी —

संगमनेर हे ऐतिहासिक व सुसंस्कृत शहर असून या शहराच्या समृद्ध  इतिहासाच्या माहितीत भर घालण्याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली असून स्थानिक इतिहास लेखनातून संगमनेरचा इतिहास अधिक समृद्ध होईल असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक डॉ. नवनाथ वाव्हळ यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने आयोजित कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीनानाथ पाटील हे होते. तर व्यासपीठावर उप प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ, इतिहास विभाग प्रमुख डॉ.त्र्यंबक राजदेव, उपप्राचार्य विलास कोल्हे, प्रा. जयराम डेरे, प्रा.स्वाती ठुबे, प्रा. वैशाली शिंदे, प्रा. गणेश वाळुंज, प्रा. नाना दिघे, प्रा. चांगदेव शिंदे, प्रा. सचिन दोरगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.वाव्हळ म्हणाले की, आधुनिक भगीरथ डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचवली. अशा विभूतींचे स्मरण करून त्यांच्या जीवन कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे. थोरात महाविद्यालयाने स्थापन केलेले इतिहास मंडळ हे नवीन संशोधकांना प्रेरणा देणारे आहे. संगमनेर हे प्राचीन शहर असून या भूमीला दंडकारण्याची भूमी म्हणूनही ओळखले जात आहे. मध्ययुगीन कालखंडात शहाजीराजे भोसले, मोगल बादशहा शहाजहान तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी या परिसरात वास्तव्य केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, कवी अनंत फंदी, जोर्वे संस्कृती, अहमदनगरची निजामशाही, बहिर्जी नाईक, अहिल्याबाई होळकर यांचे वास्तव्य, स्वातंत्र्योत्तर काळात पंडित नेहरू, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांनी संगमनेरला दिलेल्या भेटी अशी अनेक ऐतिहासिक समृद्धता संगमनेरची आहे. या विभागाचा स्थानिक इतिहास जाणून घेण्यासाठी युवकांनी संशोधना सह स्थानिक लेखनावर भर दिला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.

तर डॉ. त्रिंबक राजदेव म्हणाले की, स्थानिक इतिहास हाच राज्याचा व देशाचा इतिहास निर्माण करण्यात मोलाचे योगदान देत आहे. प्रत्येक इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचा, वाडीचा, वस्तीचा, ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास लिहिला पाहिजे. यातून इतिहासाच्या ज्ञानात अधिक भर होईल असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहलता थिटमे यांनी केले. तर श्रीकांत हापसे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी इतिहासाचे आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!