छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात ! 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अफजलखानाचा वध शिवरायांच्या इतिहासातील मोठी घटना. या घटनेवर सिनेमा, पुस्तके, कादंबऱ्या, अनेक लेख लिहिले गेले आहेत. खानाला ठार मारण्यासाठी छत्रपतींनी वाघ नखांचा उपयोग केला होत. तीच वाघनखं आता महाराष्ट्रात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ठार मारण्यासाठी वापरलेली वाघ नखं महाराष्ट्र सरकारला मिळणार आहेत. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडून तीन वर्षांसाठी कर्जावर ही वाघ नखं दिली जाणार आहेत, असे सांस्कृतिक कार्य विभागाने या आठवड्यात जारी केलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस या चार संग्रहालयातात हे मौल्यवान शस्त्रं सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी ठेवली जातील, असे सरकारने म्हटले आहे.

लंडनमधून वाघ नखं परत आणण्याबाबत सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती वाघ नखांचे प्रदर्शन आणि राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांच्या योजनांना अंतिम रूप देईल.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघ नखं नोव्हेंबर महिन्यात मुंबईत आणणार असल्याचे सांगितले होते. मुनगंटीवार युनायटेड किंगडमला भेट देतील आणि 3 ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसह सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा लंडनला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले होते, परंतु शिंदे यांनी नुकताच आपला आठवडाभराचा यूके आणि जर्मनी दौरा रद्द केला.

११ सदस्यीय समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे आहेत. यात सरकारी अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस महासंचालक, मुंबई आणि नागपूरचे पोलीस आयुक्त, राज्य पुरातत्व संचालनालय आणि संग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे यांचाही समितीत सहभाग आहे.

व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते, की वाघ नखांचे प्रदर्शन शस्त्रांच्या इतिहासात नवीन संशोधन करण्यास वाव देईल. “सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानावर मिळवलेल्या विजयाची गाथा ऐतिहासिक आहे, त्यामुळे आम्हाला आनंद होत आहे की ३५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वाघ नखं भारतात नेली जात आहेत. महाराष्ट्र सरकारसोबत भागीदारीत काम करण्यास उत्सुक आहोत,” असे म्युझियमच्या प्रवक्त्याने सांगितले होते. ( सौजन्य मटा)

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!