सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

प्रतिनिधी —

सरदार त्रिंबकजी डेंगळे यांची १९४ वी पुण्यतिथी संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथे साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्याची प्रभातफेरी काढण्यात आली. सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या वाड्यासमोर जयघोष करण्यात आला. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. के. पी. डेंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक भूषण देशमुख उपस्थित होते. तसेच राजमाता जिजाऊंच्या माहेरकडील लखुजीराजे जाधवराव यांचे माहेगाव देशमुख येथील वंशज गजेंद्र जाधवराव, संगमनेरचे इतिहास अभ्यासक विठ्ठल शेवाळे, पानोडीच्या ऐतिहासिक सरदार थोरात घराण्यातील भवानराव थोरात यावेळी उपस्थित होते.

इंग्रजांविरुद्ध संघर्ष करणारे, शेवटच्या पेशव्यांचे कारभारी सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचा गौरवशाली इतिहास गावाला लाभलेला आहे. त्यांच्या स्मृतींचे जतन व्हावे तसेच गावात सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी इच्छा याप्रसंगी सर्वानी व्यक्त केली. त्यानंतर विठ्ठल शेवाळे यांच्या उज्ज्वल उद्यासाठी त्रैमासिकाच्या ‘सरदार त्रिंबकजी डेंगळे विशेषांका’चे स्व. वामनराव जोंधळे ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचे अभ्यासक सुमित डेंगळे यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक सागर यांनी केले. सरपंच प्रतिभा जोंधळे, उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे, प्रवरा सहकारी बँकेचे व्हॉईस चेअरमन मच्छिंद्र थेटे, सोसायटीचे चेअरमन ठकाजी थेटे, शाळेचे मुख्याध्यापक विलास देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

दरम्यान कार्यक्रमानंतर सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या वाड्यात हेरिटेज वॉक घेण्यात आला. वाड्यातल्या बारीकसारीक बाबींची माहिती यावेळी सहभागी मंडळींना सुमित डेंगळे यांनी दिली. यावेळी लोणी येथील प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे बरेच विद्यार्थी हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाचं व्यवस्थापन ‘सरदार त्रिंबकजी डेंगळे पुण्यतिथी आयोजन समिती २०२३’ यांच्या वतीने करण्यात आले होतं. दिलीप डेंगळे, रामकृष्ण लंगोटे, संजय थेटे, डॉ. विजय वदक, प्रभाकर टिळेकर, सुमित डेंगळे, विनोद डेंगळे, शुभम तळोले, तेजस गुंजाळ इत्यादी मंडळींनी कार्यक्रम यशस्वी होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!