संगमनेर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
प्रतिनिधी —
संगमनेर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ.आर.बी. ताशिलदार, , प्रा.अरुण लेले, प्रा.डॉ. कुरकुटे एच.टी. सचिव संतोष फापाळे, विजय पाटील मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि समाजसेवक म्हणून ओळखले जाते. त्यांनी वर्णव्यवस्थेत खितपत पडलेल्या बहुजन समाजाला शिक्षणासाठी सर्वोतोपरी सहाय्य करुन मोलाचे कार्य केले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण केले. स्त्री शिक्षण आणि सामाजिक प्रगतीसाठीही काम केले. अस्पृश्यता मिटविण्यासाठी बालपणासूनच कार्यरत राहीले. शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून स्वःखर्चाने वसतिगृहांची स्थापना केली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘ज्ञानाची गंगा’ खेडोपाडी, वंचित बहुजनांच्या झोपडीत पोहचविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. म्हणून ते भारतीय न्यायप्रिय शिक्षण क्रांतीचे अग्रदूत म्हणून संबोधले जातात असेही ते म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केलेली ‘कमवा व शिका योजना’ आज संस्कार केंद्र म्हणून मान्यता पावत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एक गुण आपण आत्मसात केला तर आपल्या जीवनात परिवर्तन घडुन येईल. या महामानवाचा आदर्श डोळयासमोर ठेवलेले विद्यार्थी कष्टाने आणि मेहनतीने शिकतील आणि कष्टाने शिकलेला विद्यार्थीच जागतिक आव्हाने पेलण्यास सक्षम बनतील असेही त्यांनी वेळी स्पष्ट केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सीए नारायणजी कलंत्री, खजिनदार राजकुमार गांधी व व्यवस्थापनातील सर्व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय पाटील यांनी केले तर आभार प्रा.एच.टी. कुरकुटे मानले. या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

