थकबाकीदार कृषिपंपधारकांवर महावितरणची कृपा
२४ तास वीज :  घारगावातील प्रकार ;

गावठाणात विजेचे झटके.!

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील घारगाव महावितरण उपकेंद्रांतर्गत शेतकऱ्यांना शेती पंपासाठी साडे पाच तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. गावठाणाला १६ ते २४ तास वीज दिली जाते. मात्र, गावठाणालगत असलेल्या काही कृषीपंपांना महावितरणने गावठाणातून वीजपुरवठा केल्याने गावठाणात सतत वीजपुरवठा खंडित होत असून कमी-जास्त प्रमाणात वीज प्रवाह येत असल्याने घरातील उपकरणे निकामी होण्याची शक्यता आहे.
घारगाव येथे महावितरणचे ३३/११ केव्ही चे उपकेंद्र आहे. येथून अनेक गावांना वीजपुरवठा केला जातो. कृषी पंपांचे वीज बिल थकल्याने डिसेंबर महिन्यात महावितरण कडून १६० थ्रीफेज रोहित्र बंद करण्यात आले होते. काही शेतकऱ्यांनी उसने पैसे घेऊन बिले भरले. वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. अद्यापही बिलांअभावी काही रोहित्रे बंद आहेत.

असे असताना दुसरीकडे घारगाव गावठाणातून लगतच्या कृषीपंपांना वीजपुरवठा दिला गेला आहे. तर काही शेतकऱ्यांनी आकडे टाकून कृषीपंपांना वीज घेतली आहे. या शेतकर्यांना २४ तास वीज मिळते आहे. थकबाकी असूनही वीज पुरवठा सुरळीत सुरु आहे. अशा प्रकारे दुजाभाव का केला जातो असा प्रश्न इतर गावांतील शेतकर्यांनी उपस्थित केला आहे. सिंगलफेज फिडर ओवर लोड झाल्याने सतत वीजपुरवठा खंडित होतो आहे. अनेकदा डीपी वरील फेज जातात. मात्र, या सर्व प्रकाराकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत . याबबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या मात्र, महावितरणच्या अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहेत.
वीज २४ तास : बिल आकारणी ८ तासांची
गेल्या अनेक वर्षापासून घारगाव गावठाणालगत असलेल्या शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी महावितरणने २४ तास वीज दिली आहे. मात्र, या शेतकऱ्यांकडून फक्त आठ तासांचे वीज बिल आकारले जाते आहे. तरीही या शेतकऱ्यांची थकबाकी कायम आहे. अन्य शेतकऱ्यांना साडे पाच तास वीज दिली जाते. मात्र येथील शेतकरी थकबाकीत असूनही २४ तास वीज दिली जाते याबाबत महावितरण अधिकारी व कर्मचारी यांची संशयास्पद भूमिका असल्याचे बोलले जाते आहे. महावितरणकडून या शेतकऱ्यांना  इतर शेतकऱ्यांप्रमाणे वीज दिली जाणार का ? मागील बिलांचे २४ तासाप्रमाणे बिल आकारणी होणार का ? आकडे टाकणाऱ्या शेतकऱ्यांवर काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून भिजत पडला आहे. काही कारणास्तव गावठाणा मधून लगतच्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जात आहे. आता त्यांना वेगळा वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसा प्रस्तावही करण्यात आलेला आहे. त्यासाठी ज्या तांत्रिक बाबी पूर्ण करायच्या आहेत त्या लवकरच पूर्ण होऊन गावठाणा मधून ज्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा होतो तो खंडित करून शेतकऱ्यांना शेतीसाठी ज्या पद्धतीने वीज पुरवठा पुरवठा केला जातो, तसा वेगळा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. असे वीज वितरण कडून सांगण्यात आले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!