प्रवरा नदी प्रदूषण… ग्रामस्थांच्या गावोगावी बैठका…
आंदोलन अधिक तीव्र करणार..
प्रतिनिधी —
संगमनेर साखर कारखाना, दूध संघ आणि नगर परिषदेच्या वतीने प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषीत पाण्या विरोधात गावोगावी ग्रामस्थांनी बैठका सुरू करून या आंदोलनाला अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.ग्रामस्थांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने प्रदूषित पाण्याच्या विरोधातील अराजकीय चळवळ अधिक तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने कोल्हेवाडी येथे आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला.
प्रवरा नदीपात्रात अनेक वर्षांपासून प्रदूषित पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांसह शेती आणि पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे.याविरोधात २०१८ सालापासून विविध गावातील तरूण कार्यकर्त्यांनी लढा उभा केला.परंतू प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्पुरत्या आश्वासनावर बोळवण केल्याने नदीपात्रात प्रदूषित पाणी सोडणे बंद झालेच नाही.
मागील काही दिवसांपासून नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी आपल्या सह्यांची निवेदन तसेच ग्रामपंचायतीनी या प्रदूषित पाण्याच्या विरोधात केलेले ठराव जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार अर्ज करून सादर प्रदूषित पाणी सोडणाऱ्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
ग्रामस्थांनी एकत्रितपणे येवून स्थापन केलेल्या प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून गावोगावी कृती समितीने लावलेल्या फ्लेक्सबोर्ड वरून या आंदोलनाला राजकीय गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. फ्लेक्सबोर्ड फाडणा-यां विरोधात कादेशिर कारवाई करावी अशा मागणीसाठी कृती समितीचे शिष्टमंडळ प्रांताधिकारी आणि पोलिस उपअधिक्षकांना भेटले. मात्र पोलिस प्रशासनाने फ्लेक्सबोर्ड फाडणा-यांविरोधात कारवाई करण्याऐवजी हे आंदोलन राजकीय असल्याचे पत्रक काढून फ्लेक्सबोर्ड लावण्यास बंदी घातल्याने याची तीव्र प्रतिक्रिया गावोगावी उमटलीच पण यापेक्षाही कोल्हेवाडी येथील बैठकीत ग्रामस्थांनी पोलिसांच्या या कृतीचा शिषेध करुन, संतपाजनक प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
फ्लेक्स बोर्ड फाडल्याबद्दल एका सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांने सत्कार केल्याचे फोटो पोलीसांना दाखवूनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करीत आहे असा सवालही कृती समितीने उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर कृती समितीने गावोगावी बैठका सुरू केल्या.कोल्हेवाडी येथे झालेल्या बैठकीस नदीकाठच्या गावांसह तालुक्यातील इतर गावांतील कार्यकर्ते उपस्थित होते.हे आंदोलन अराजकीय असून कोणाच्याही पाठबळा शिवाय सुरू केलेली ही चळवळ अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला. पोलीस प्रशासनाने हे आंदोलन दडपशाहीने मोडण्याचा सुरू केलेल्या प्रयत्नांवरही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.
प्रदूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याने आमच्या जीवन मरणाचा प्रश्न एकत्रित येवून सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या चळवळीत सर्व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. कोणाच्या पाठबळाशिवाय ही चळवळ सुरू झाली असून राजकीय व्यक्तीनी या चळवळीस पाठबळ द्यावे ही अपेक्षा नाही असे ठणकावून सांगतानाच प्रशासनाच्या विरोधात सुरू झालेली ही अराजकीय चळवळ असल्याने भविष्यात विद्यार्थी युवक महीला सेवाभावी संघटना यानांही या आंदोलनात सहभागी करून घेत प्रदूषित पाण्याविरोधात जनआंदोलनाचा इशारा बैठकीत देण्यात आला.
याबैठकीस नदीकाठच्या गावांसह नदीपात्रात पाणी पुरवठा योजनेच्या विहीरी असलेल्या गावातील ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.
